| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 25th, 2021

  त्रिमूर्ती नगर मटन मार्केट अतिक्रमणावर तिन दिवसात कारवाई करावी – महापौर दयाशंकर तिवारी

  नागरिकांच्या तक्रारीनंतर महापौरांनी आढावा बैठकीत दिले निर्देश

  नागपूर : त्रिमूर्ती नगर येथील नाल्यालगत असलेल्या जागेवर मटन विक्रेत्यांनी अतिक्रमण करून मटण मार्केट थाटले आहे. त्यामुळे होणा-या वाहतुक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी लक्ष्मी नगर झोन क्र. १ येथे सोमवारी (ता. २५) संबंधित अधिकारी आणि नगरसेकांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीत त्रिमूर्ती नगर मटन मार्केट येथील मटन व चिकन मार्केटच्या अतिक्रमणाचे ओटे व शेड तिन दिवसाचे आत काढून या ठिकाणी इमारतीचा मलबा टाकण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच झोनमध्ये संध्याकाळी ६ ते ८ व सकाळीसुध्दा कारवाई करून रस्त्यावरचे अतिक्रमणकर्त्यांचे साहित्य जप्त करावे, असे आदेश महापौरांनी यावेळी दिले.

  मनपाच्या लक्ष्मी नगर झोन येथे झालेल्या बैठकीत झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेवक सर्वश्री दिलीप दिवे, प्रमोद तभाने, नंदाताई जिचकार, सोनालीताई कडू, सहायक आयुक्त गणेश राठोड, आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी रामभाउ तिडके, कार्यकारी अभियंता विजय गुरबक्षाणी, उप अभियंता निलेश बोबडे, सहायक अधिकक्षक धनंजय जाधव, कनिष्ठ अभियंता नितिन रामटेके, कनिष्ठ अभियंता अनंद लामसोंगे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अनिल मुठे, गोपाल नवघरे, आदी उपस्थित होते.

  द्रोणाचार्य नगर आणि सरस्वती विहार येथील नागरिकांनी काही दिवसांपुर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांना यासंबंधी निवेदेन दिले होते. महापालिका प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. निवेदनाची दखल घेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्रिमूर्ती नगर येथील मटण मार्केटमधिल अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

  कारवाईसाठी आवश्यक पोलीसबळाचा उपयोग करून याठिकाणी इमारतीचा टाकाऊ मलबा टाकण्यात यावा. जेणेकरून अतिक्रमणकर्ते पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमण करणार नाही, असे महापौर म्हणाले. यासाठी उपायुक्त अतिक्रमण तसेच कार्यकारी अभियंता यांनी आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी इत्यादी साधनमुग्री उपलब्ध करून द्यावी. यावेळी लक्ष्मीनगर झोनचे नगरसेवक व कर्मचा-यांच्या वतीने महापौरांचे पुष्पगुच्छ देवून स्नेहील स्वागत करण्यात आले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145