कोव्हिड लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात कोव्हिड लसीकरणाची तयारी सुरू झाली असून याच अंतर्गत नागपूर शहरातील शासकीय, निमशासकीय आणि मनपा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. २३) टाऊन हॉल, महाल येथे प्रशिक्षण देण्यात आले.
लसीकरण कसे करायचे, लसीकरणासाठी कुठली जागा असावी, संबंधित जागेवर काय-काय सोयी असाव्यात, लोकांना लसीकरण केंद्रावर कसे आणायचे, माहिती कोव्हिड ॲपवर कशी अपलोड करायची आदींबाबत यावेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी कोव्हिड-१९ साठी केलेल्या उपाययोजना आणि लसीकरण कार्यक्रमावर प्रकाश टाकला. डॉ. वैशाली मोहकर यांनी लसीकरण कार्यक्रम नियोजनाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.
लसीकरण कसे करावे, लसीकरण केंद्रातील व्यवस्था, लसीकरणासंदर्भात शासनाचे दिशानिर्देश आदींबाबत एस.एम.ओ. (जागतिक आरोग्य संघटना)चे डॉ. साजीद खान यांनी व्हिडिओ, सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. लसीकरणादरम्यान संपूर्ण माहिती अपलोड करण्यासाठी ‘को-विन’ ॲप तयार करण्यात येत आहे. याबाबत अश्विनी नागर यांनी माहिती दिली. रविल यादव यांनी कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक मॅनेजमेंट याबाबत मार्गदर्शन केले. सुरक्षित लसीकरण आणि जैविक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत डॉ. संजय चिलकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. यासोबतच टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनीही विविध विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना आणि प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, समन्वयक दीपाली नागरे यांनी सहकार्य केले.