| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 23rd, 2021

  उत्तर नागपुरात तीन उड्डाण पूल बनणार : ना. गडकरी

  जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन,कामठीरोडवर डबल डेकर पूल बनणार, 2 वर्षात मिहानमध्ये 1 लाख तरुणांना रोजगाराचे प्रयत्न


  नागपूर: शहराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यासाठीही आम्ही मागे राहिलो नाही. उत्तर नागपुरात आता तीन उड्डाण पूल निर्माण होणार आहेत. आणखी कामे प्रस्तावित आहेत. आतापर्यंत 90 हजार कोटी विकास कामांसाठी नागपुरात आणले. ही सर्व कामे जनतेमुळे झाली आहेत. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

  केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन समारंभ ना. गडकरी यांच्या हस्ते झाला.त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आ. सुधाकर देशमुख, माजी आ. डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, अशोक मेंढे आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलासाठी 80 कोटी खर्च करण्यात येणार आहे व 740 मीटर लांब या पुलाची लांबी आहे.

  याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- इंदोरा चौक ते अग्रसेन चौक, अशोक चौक ते शितलामाता मंदिर असा उड्डाणपूल निर्माण केला जाणार आहे. या कामाची किंमत 440 कोटी आहे. पुढे डागा हॉस्पिटलजवळ उड्डाणपुलावर चढण्या उतरण्यासाठी रॅम्पची तरतूद करण्यात येणार आहे. हा ÷उड्डाणपूल अशोक चौकातून पुढे उमरेड रोडपर्यंत प्रस्तावित आहे.

  शहरालगत केंद्रीय मार्ग निधीतून 450 कोटींचा काँक्रीटचा रिंग रोड बांधला. त्यापुढे 1200 कोटींचा रिंग रोड पुन्हा घेण्यात आला आहे. आधी उत्तर नागपुरातून महाल भागात जाणे अडचणीचे होते. पण इटारसी उड्डाणपुलामुळे आता 10 मिनिटात हे अंतर कापता येणार आहे. तसेच उत्तर नागपुरात सर्वात मोठा मॉल बनविण्याचा माझा प्रयत्न असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले-सध्या मेट्रोच्या असलेल्या मर्यादा वाढवून कन्हान, बुटीबोरी, हिंगणा गावापर्यंत मेट्रो नेण्यात येईल. ब्रॉडगेज मेट्रोबाबत 15 दिवसात निर्णय होईल. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात चांगल्या सोयीसुविधा शहरवासियांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मिहानमध्ये आलेल्या कंपन्यांमध्ये 56 हजार तरुणांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध झाला. येत्या 2 वर्षात 1 लाख तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे माझे लक्ष्य असल्याचे ना. गडकरी म्हणाले.

  पी. एम. आवास योजना, स्वच्छ भारत, शेतकर्‍यांसाठी किसान रेल्वे, शहराला मुबलक पाणी, वीज अशा सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कोणतीही जात, पात, पंथ, धर्म, पक्ष न पाहता जो येईल त्याची कामे आपण केली. पण या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे. त्यांच्यामुळेच ही कामे मी करू शकलो, असे सांगून ना. गडकरी यांनी जनतेला अभिवादन केले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145