बाबासाहेबांच्या विचारांची सर्वदूर रूजवणूक हीच खरी आदरांजली
ॲड. धर्मपाल मेश्राम : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन
नागपूर :मानवमुक्तीच्या लढ्यातील जागतिक स्तरावरील अग्रणी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सर्वदूर रूजवणूक हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संविधान चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले.
यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव मेंढे, मनपा सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, शहर महामंत्री संजय बंगाले, माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, प्रदेश सचिव सतीश शिरसवान, शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, शहर भाजपा मंत्री ॲड. राहुल झांबरे, भैय्याजी बिघाणे, शंकर मेश्राम, रोहन चांदेकर, राजू चव्हाण, अजय करोसिया, अतुल सुखदेवे, आनंद अंबादे, सुनील वहाने, अशोक डोंगरे, पारस रगडे, विराग राऊत, जयसिंग कछवाह, प्रभाकर मेश्राम, मार्टिन मोरेश, प्रदीप मेंढे, संजय बंगाले, राहुल मेंढे, भोलानाथ सहारे, सुधीर घोडेस्वार, नेताजी गजभिये, उपेंद्र वालदे, दिपक शेलारे, रणजित गौर, नम्रता माकोडे, शशीकला बावणे, बंडू गायकवाड, इंद्रजित वासनिक, पंजाबराव सोनेकर, चंद्रशेखर केडझरे, अजय बागडे, राहुल बेलेकर, चंदू सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करताना ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, भारतासारख्या अनेक जाती, धर्म, भाषा, वेशभूषा, खानपान असलेल्या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक जीवनमूल्य रूजविणारे संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिले. रांगेतल्या सर्वात शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा लढा आपल्या कृतीतून आणि उक्तीतून बाबासाहेबांनी आदर्शवत या समाजाला दिला. भाकरा नांगल धरणाची मुहूर्तमेढ, वीजेचा विषय राज्याचा वा केंद्राचा का असावा, रिझर्व्ह बँकेची स्थापना यासह अनेक विषयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला झिजवलं, या देशाला घडविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन या देशाला समर्पित केले. गोरगरीब, सर्वसामान्य अशा कोटी लोकांचे श्रद्धास्थान असलेले बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व आहे.
शब्दही अपुरे पडली, आयुष्यही अपूरे पडेल अशा स्वरूपाचे जीवनसंघर्ष, त्याचा पाया आणि त्याचे उदाहरण समाजाला, देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांनी दिलेल्या या सन्मानाच्या आयुष्याची परतफेड करताना त्यांच्या विचारांची सर्वदूर रूजवणूक करून कायम ऋणात राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.