| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 8th, 2021

  विद्यार्थ्यांच्या नावाने शाळेची ओळख हा मनपाचा गौरव : महापौर दयाशंकर तिवारी

  सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेला दिली भेट : विद्यार्थ्यांशी साधला संवाद

  नागपूर : विद्यार्थ्यांच्या मनात अनेक कल्पना असतात त्या कल्पनांना योग्य बळ मिळाले, ते प्रत्यक्षात साकार करण्याचा मार्ग त्यांना दाखविला की, ते विद्यार्थी आकाशात उंच झेप घेतात. नागपूर महानगरपालिकेच्या शाळा आज शिक्षणक्षेत्रातील संकल्पना बदलविण्यास सज्ज झालेल्या आहेत. शहरातील टुमदार खाजगी शाळांना जे जमले नाही ते आमच्या मनपाच्या शाळेतील, झोपडपट्टीत राहणा-या, सर्वसामान्य गरीब घरातील विद्यार्थ्यांनी करून दाखविले आहे. काही वर्ष मागे गेल्यास शाळांची ओळख ही तेथील शिक्षकांच्या नावाने व्हायची. आज सोशल मीडियाच्या या विश्वात विद्यार्थी स्वत:च आपल्या कल्पना शिक्षकांपुढे मांडतात, शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका निभावून त्यांच्या कल्पनांच्या पंखांना बळ देउन त्या साकारतात. पुढे हेच विद्यार्थी समाजात, देशात आपली छाप सोडतात. या विद्यार्थ्यांच्या नावाने शाळेची ओळख होउ लागते. अशीच ओळख स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या प्रतिभावंत विद्यार्थिनींनी सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेला दिली आहे. हा संपूर्ण नागपूर महानगरपालिकेचा सन्मान आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

  तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे होणाऱ्या जागतिक रेकॉर्डसाठी देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या निवडीबद्दल मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील स्वाती मिश्रा आणि काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरूवारी (ता.७) त्यांच्या कक्षात सत्कार केला. मुबलक साधनसामुग्रीमध्ये मिळविलेले हे यश शहरासाठी गौरवाची बाब असून या दोन्ही विद्यार्थिनींसह शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौरांनी स्वत: शुक्रवारी (ता.८) शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेविका माया इवनाते, नगरसेवक विक्रम ग्वालबंशी, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर उपस्थित होते.


  शाळेच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी शाळेची संपूर्ण माहिती यावेळी मान्यवरांना दिली. शाळेतील छोटेखानी प्रयोगशाळेची सुद्धा महापौरांनी पाहणी केली. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका छाया कौरासे, शाळा निरीक्षक नंदा मेश्राम, शिक्षिका कल्पना मालवे, माधवी मावळे, प्रणाली बगले, बरखा जायस्वाल, उषा यादव, शिक्षक श्रीराम गावंडे, अविनाश भूत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

  मनपाच्या शाळांबाबत अजूनही काही भागात नागरिकांचा दृष्टीकोन बदललेला नाही. हा दृष्टीकोन बदलण्यासाठी आपल्या शाळांच्या यशोगाथेची महती दूरपर्यंत पोहोचविण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. शाळेच्या इमारतीच्या स्थितीबाबत शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांनी माहिती दिली. शाळेच्या इमारतीसंदर्भात तातडीने सकारात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी शिक्षणाधिका-यांना दिले. यामध्ये काही अडचण आल्यास आपण व्यक्तीश: ती दूर करू असेही महापौरांनी सांगितले.

  शिक्षणाप्रती व विद्यार्थ्यांच्या भविष्याप्रती असलेल्या आस्थेतून महापौरांनी आपली पहिली भेट मनपाच्या शाळेला दिल्याबद्दल शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे आभार मानले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145