Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 27th, 2021

  कोरोना नियंत्रणात नागरिकांची उत्तम साथ प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

  · भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात

  · लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

  नागपूर, : नागपूर जिल्ह्यात साधारण एक लाख तीस हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मे ते ऑगस्ट याकाळात भीषण परिस्थिती होती. मात्र या कालावधीत न डगमगता नागपूर जिल्ह्यात व विभागात कोरोना नियंत्रण करण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेने उत्तम काम केल्याची पावती पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिली. प्रशासनाला नागपूरकर जनतेने देखील उत्तम साथ दिली. प्रारंभीच्या हतबलतेपासून तर आताच्या लसीकरणांपर्यंतचा हा कोविड लढा जनता, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या सामूहिक दृढतेचा विजय असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

  भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलिस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.

  कोरोना महामारीत विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे जिल्ह्यात व विभागात कोरोना नियंत्रणात आला. कोरोना काळात बेडची उपलब्धता, ऑक्सिजन, रेमिडीसीवर औषध व कोविड केंद्रांची उपलब्धता यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, आरोग्य उपसंचालक व अन्नधान्य वितरण, गृह विभाग या विभागांनी उत्कृष्ट समन्वयांसह मोलाची कामगिरी केली. ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेमुळे घरोघरी आरोग्य यंत्रणा पोहोचली. शासनाने एकूण 169 कोटीची मदत कोरोना उपाययोजनासाठी केली. डॉक्टर, पोलीस, मदतनीस,सफाई कामगार, शासकीय कर्मचारी यासगळया स्तरातील घटकांनी केलेली मदत हा माणुसकीचा गहिवर असल्याचे पालकमंत्र्यांनी कृतज्ञतेने सांगीतले.


  स्वयंसेवी संस्थाच्या कामाचा ठळकपणे त्यांनी उल्लेख केला. विभागात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आलेली पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 64 कोटीची मदत केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्यटनाला विकसित करण्यासाठी बुद्धिस्ट थीम पार्क, चिचोली येथील म्युझियम, उर्जा पार्क, बुद्धिस्ट सर्कीट या प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

  जिल्हयात 2 हजार 344 कृषी पंपाना जोडणी देण्यात आली आहे. निसर्ग वादळाने कोकणात केलेल्या नुकसानात उर्जा विभागाने उत्तम काम केले. उर्जा विभागाच्या विविध योजनांना गतिमान करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 43 हजार खातेधारक शेतकऱ्यांना 370 कोटी रुपयाची कर्जमाफीचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. नोकर भरतीसाठी शासन प्रयत्नरत आहे. युवाशास्त्रज्ञ श्रीनभ अग्रवाल यांची राष्ट्रीय बालपुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. पद्मश्री मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ तसेच साहित्यिक नामदेव काबंळे यांचाही गौरवपर उल्लेख पालकमंत्र्यांनी केला.

  कोविडवर लस आली असली तरी सर्वानी अजुनही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व शारिरीक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्राथम्य देण्यात येत आहे. व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी काळ आरोग्यदायी ठरण्याच्या शुभेच्छांसह पालकमंत्र्यांनी भाषणाचा समारोप केला.

  कोरोना योद्धांचा सत्कार
  प्रजासत्ताकदिनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचा पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

  अंबाझरी पोलीस ठाण्याचे शारदाप्रसाद रमाकांत मिश्रा यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

  काटोल येथील वीरमाता श्रीमती मीरा रमेशराव सतई आणि हिंगणा येथील विरपत्नी श्रीमती प्रमिला नरेश बडोले यांना ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले.

  जिल्हा आरोग्य अधिकारी (अतिरिक्त) डॉ. असिम इनामदार, हिंगणाचे तालुका आरोग्य अधिकारी प्रविण पडवे यांच्यासह भारत स्काऊट गाईडमधील मंजुषा रुपसिंग जाधव, सागर नंदकिशोर श्रीवास यांना सन्मानित करण्यात आले.

  शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुनिल महाकाळकर, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे डॉ. धिरज सगरुळे, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सरचे डॉ.डी. पी.सेनगुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपविभागीय अधिकारी, नागपूर शहर शेखर घाडगे व श्रीमती इंदिरा चौधरी, तहसिलदार, नागपूर शहर श्री. सुर्यकांत पाटील यांना पुरस्कृत करणत आले. डागा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सिमा पारवेकर सवई, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलभा मूल, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधुरी थोरात, महानगरपालिकाचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी भैसारे, साथरोग विभागाचे श्री. वासुदेव आकरे यांना सन्मानित करण्यात आले.

  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेते रोशन सुरेश भोयर, अक्षय सितकुरा मरस्कोल्हे आणि विशाखा परीहर समरीत यांचा सत्कार करण्यात आला.

  मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत बबन कान्हुजी काटोले, आनंद प्रबोध सदावर्ते, महेश गणपतराव चौधरी, विमल वामन बानाईत, नरेंद्र सितारम बांगडे, सुमन शामराव कठाने, मिना श्रीराम कठाने, नामदेवराव पुनारामजी भारस्कर, भैय्यालाल बारकुजी नाईक, मंगला अरविंद इटनकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मागणीपत्र वितरीत करण्यात आले.

  स्वर्णिम विजय वर्षानिमित्त विजय ज्योतीचे उद्घाटन करणाऱ्या दोन अधिकारी व 15 सैनिकांचा गौरव करण्यात आला.

  ए पी जे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन रामेश्वरम आणि स्पेस झोन इंडियातर्फे आयोजित पेलोड क्यूब चॅलेंज उपक्रमात विदर्भातून 160 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी नागपूर सुरेंद्रगढ महापालिका हिंदी शाळेच्या स्वाति विनोद मिश्रा आणि काजल रामनरेश शर्मा विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विज्ञान शिक्षिका दीप्ती बिष्ट ह्यांना देखील सन्मानित करण्यात आले.

  कार्यक्रमाचे संचलन डॉ. दिपक साळीवकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिकांसह माजी आमदार यादवराव देवगडे, एच.क्यु झमा, माजी खासदार गेव्ह आवारी यासह विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145