स्वामी विवेकानंदांनी जगाला दिलेली जीवनाची दिशा आजही मागदर्शक : महापौर दयाशंकर तिवारी
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त महापौर, उपमहापौर, आयुक्तांनी केले अभिवादन
नागपूर : स्वामी विवेकानंद यांचे विचार हे संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहेत. १८व्या शतकात त्यांनी मांडलेले जीवनाचे तत्वज्ञान आज २१व्या शतकातही मार्गदर्शक ठरत आहेत. शिक्षण, तत्वज्ञान, आध्यात्म हे सर्व विषय मानवाच्या जीवनात आवश्यक आहेत ही बाब पटवून देत मानव कल्याणासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केले. आज शाश्वत विकासासाठी सर्वत्र काम सुरू आहे. मात्र १८व्या शतकात निसर्गातूनच शाश्वत विकास साधता येउ शकतो, ही संकल्पना स्वामी विवेकानंद यांनी मांडली. जगाला जीवनाची नवी दिशा देण्याचे महत्वाचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. ती दिशा आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.१२) महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारकस्थळी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका डॉ.परिणीता फुके, प्रभारी उपायुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, माजी महापौर नरेश गावंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश शेराम, अविनाश साहू, नितीन महाजन, विमलकुमार श्रीवास्तव, स्वाती गुप्ता, पुरूषोत्तम घोरमारे, विवेक मेंढी आदी उपस्थित होते. शहरातील प्रसिद्ध कलावंत सर्जेराव गलपट यांनी स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेमध्ये स्मारकात उपस्थिती दर्शविली.
महापौर दयाशंकर तिवारी, आमदार विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य मान्यवरांनी स्मारक स्थळावरील स्वामी विवेकानंदांचे जीवनचरित्र दर्शविणा-या सभागृहाची पाहणी केली. सभागृहामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शविणारे म्यूरल लावण्यात आलेले आहेत. शिवाय दृक श्राव्य माध्यमातून त्यांचे जीवनचरित्र समजून घेता यावेत यासाठी टिव्ही स्क्रिनही लावण्यात आलेल्या आहेत. मात्र नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ते अद्याप सुरू झालेले नाहीत. प्रशासनिकदृष्ट्या येणा-या अडचणी सोडवून ते सुरू केल्यास शहरातील लहान थोरांसह तरुणांना स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्राची माहिती होण्यास मदत होईल, याला लवकरात-लवकर सुरु करावे, अशी सूचना यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांना केली.
स्वामी विवेकानंद हे देशातील प्रत्येकासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कार्याची महती सर्वत्र पोहोचविण्यासाठी मनपाने उभारलेले स्मारक हे अतिशय सुंदर व प्रेरणादायी आहे. या स्मारकस्थळी येणा-या प्रत्येकाला स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्राची माहिती व्हावी याकरिता स्मारक स्थळावरील स्वामी विवेकानंदांचे जीवनचरित्र दर्शविणारे सभागृह सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.