| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 9th, 2020

  बीओटी तत्त्वावर शहरांचा शाश्वत विकास साधावा : नितीन गडकरी

  व्हीएनआयटीतर्फे ‘अर्बन लॅब-1’ चे उद्घाटन

   

  नागपूर: शहरांचा शाश्वत विकास करण्यासाठी यापुढे बीओटी किंवा पीपीआय तत्त्वांवर विकास साधला जावा. कारण महापालिका, राज्य आणि केंद्र शासन यांच्याकडे निधी उपलब्ध होत नसल्यामुळे शाश्वत विकासासाठी निधी उपलब्ध करणारी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  व्हीएनआयटी तर्फे ‘अर्बन लॅब-1’चे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन प्रसंगी ना. गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले- स्वातंत्र्यानंतर 25 ते 30 टक्के ग्रामीण जनता ही शहरात स्थलांतरित झाली. शहरी भागासाठी ही एक समस्या निर्माण झाली. नवीन लोकसंख्येसाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक होते. पण पुरेशा निधीअभावी विकास खुंटण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी पीपीआय आणि बीओटी अशा संकल्पनातून स्मार्ट सिटी निर्माण करता येईल काय, याचा विचारही केला जावा. शहरात प्रत्येक भागात फळ आणि भाजी बाजाराची गरज आहे. लहान दुकाने, लहान व्यवसायी, हॉटेल, रेस्टॉरंटची आवश्यकता आहे. पारडीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने 30 कोटी रुपये बाजारासाठी दिले. तीन मजली बाजाराची इमारत, सर्वच प्रकारच्या वस्तू, लहान व्यवसायींना व्यवसायासाठी संधी उपलब्ध होणार. फुटपाथवर पार्किंगची व्यवस्था. यातून महापालिकेला महसूल मिळेल. महसूल कसा मिळविता येईल, यासाठी विविध बाजूने विचार करून प्रयत्न व्हायला हवेत, असेही ना. गडकरी म्हणाले.

  कचर्‍याचे आणि ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे शक्य असल्याचे सांगताना ते म्हणाले- स्मार्ट सिटीमध्ये कचरामुक्त शहर बनले पाहिजे. शहराचे सांडपाणी वीजनिर्मितीसाठी देऊन कचर्‍याचे संपत्तीत रुपांतर केल्याचे त्यांनी सांगितले. याच सांडपाण्यातून बायो सीएनजी काढून मनपा आयुक्त, महापौर व महापालिकेची सर्व चार चाकी वाहने सीएनजीवर आणण्याचे आपले स्वप्न आहे आणि प्रयत्नही आहेत. वैद्यकीय कचर्‍याचे जागेवरच निर्मूलन व्हावे, तसेच घरगुती कचर्‍यापासून जैविक खत निर्मिती केली जावी. त्यासाठी मशीन उपलब्ध आहेत. तसेच महिला बचत गटांकडून प्लास्टिक घेऊन डांबरी रस्त्यांमध्ये 8 टक्के त्याचा वापर केला तर प्लास्टिकची समस्याही निकाली निघेल. अशी विविध उदाहरणे त्यांनी सांगितली. लहान लहान व्यवसायातून अर्थव्यवस्था कशी वाढेल, मजबूत होईल याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

  ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना आपण मांडली आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाची मान्यताही मिळाली आहे. अमरावती, चंद्रपूर, नरखेड, गोंदिया, भंडारा या ठिकाणापर्यंत ब्रॉडगेज मेट्रो सुरू होईल. डबल डेकर 8 डब्यांच्या मेट्रोत विमानात मिळतात तशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर लोकांचे आकर्षण ठरेल. सार्वजनिक वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय समोर येईल. हीच मेट्रो बीओटी तत्त्वावर चालविली तर यशस्वी होईल. शासनाचा निधी लागणार नाही, याकडेही ना. गडकरी यांनी यावेळी लक्ष वेधले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145