| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 30th, 2020

  घरीच राहून करा नववर्षाचे स्वागत

  – मनपा आयुक्तांचे आवाहन : ३१ डिसेंबर आणि नूतन वर्षासाठी मार्गदर्शक सूचना जारी


  नागपूर : नव्या करोनावताराच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्ष स्वागत घरातूनच करण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्ष संबंधी नुकतेच मनपा आयुक्तांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  त्यानुसार ३१ डिसेंबरला रात्री फटाक्यांची आतषबाजी तसेच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजन आणि मिरवणुकांवर बंदी असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागपूर शहरात फुटाळा, अंबाझरी, धरमपेठ, गांधीसागर तलाव, इतवारी, महाल आदी ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता उपरोक्त व अन्य ठिकाणीही नागरिकांनी गर्दी न करता आरोग्याची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे, ६० वर्षावरील नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांचे सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळावे.

  ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी तलावालगत, उद्यान, रस्त्यावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना सामाजिक अंतर पाळले जाईल, मास्क व सॅनिटायजरचा वापर होईल, याचे कटाक्षाने पालन करावे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात अशावेळी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल याची विशेष काळजी घ्यावी. नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करू नये, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितले आहे.

  आदेशाचे कुणाकडूनही उल्लंघन झाल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१ व ६० नुसार तसेच भारतीय दंड संहिता मधील कलम १८८ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145