क्रीडा स्पर्धांना परवानगी नाही शासनाचे दिशानिर्देशांचे पालन करणे अनिवार्य : मनपाचे निर्देश जारी
नागपूर: शहरातील क्रीडापटूंना क्रीडांगणावर सरावासाठी मनपाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे खेळाडूंच्या सरावाना सशर्त परवानगी देण्यात आली असून त्याबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. या निर्देशानुसार कोणत्याही स्तरावरील क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा किंवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यावर बंदी घातली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे यासंदर्भात शुक्रवारी (ता.१८) आदेश जारी करण्यात आले आहेत.
क्रीडांगणावर सराव करताना सर्व खेळाडूंना कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. खेळाडू, पालक, प्रशिक्षक यापैकी कुणालाही कोव्हिडचे लक्षणे असल्यास त्यांना सरावाच्या ठिकाणी येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाद्वारे कुठल्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा अथवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. शासनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधित आयोजक व संघटनेवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी दिला आहे.
शासनाची नियमावली
– सरावाच्या ठिकाणी गर्दी होउ नये याची काळजी घ्यावी. १० ते १५ खेळाडू त्यांना नेमून दिलेल्या वेळेत सरावासाठी यावेत
– १४ वर्षाखालील खेळाडूंसाठी सरावाची वेळ वेगळी असावी. ते वरिष्ठ खेळाडूंसोबत सरावामध्ये सहभागी होउ नये याची दक्षता घ्यावी
– सर्व प्रकारच्या खेळाच्या सराव ठिकाणी प्रत्येक बॅचनंतर क्रीडा साहित्याचे मानक कार्यप्रणालीनुसार स्वच्छता, सॅनिटाईजिंग करण्यात यावे
– कोणताही खेळाडू अथवा पालकांना सर्दी, खोकला, ताप असल्यास त्यांना सरावाच्या ठिकाणी येण्यास मनाई करण्यात यावी.
– कोणत्याही स्तरावरील क्रीडा स्पर्धा अथवा कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराचे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत आयोजन करण्यात येउ नये
– सर्व खेळांचे सराव सुरू करण्यापूर्वी शासनाची मानक कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉल)चे अवलोकन व पालन करण्यात यावे.