| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jan 10th, 2021

  शेगांवीचा महायोगी” ने केले गजानन भक्‍तांना भावूक

  नितीन गडकरींच्‍या हस्‍ते झाले व्‍हर्चुअल उद्घाटन

  नागपूर: श्री गजानन महाराजांच्‍या जीवनावर व भक्‍तांना आलेल्‍या त्‍यांच्‍या अनुभूतीवर आधारित “शेगांवीचा महायोगी” या दोन अंकी नाटकांतील कलाकारांच्‍या जीवंत अभिनयाने गजानन भक्‍तांना भावूक केले. या नाटकाचा पहिला प्रयोग आज सुरेश भट सभागृहात पार पडला. कोरोना महामारी संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्‍यात आलेल्‍या या प्रयोगाला गजानन भक्‍तांची उपस्थिती लक्षणीय होती.

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते या नाटकाच्‍या पहिल्‍या प्रयोगाचे व्‍हर्चुअल उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध नाट्य दिग्‍दर्शक संजय पेंडसे, धरमपेठ महिला मल्‍टीनॅशनल सोसायटीच्‍या अध्‍यक्ष निलीमा बावने, उपाध्‍यक्ष सारिका पेंडसे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती अरुणा पुरोहित, दत्‍ता फडणवीस आणि डॉ. रवी गि-हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  पहिल्‍या प्रयोगाला गिरीश वराडपांडे, स्वप्नील मुंडे व राजेश रोकडे यांनी आवर्जुन उपस्थिती लावली.
  नागपुरातील एका भक्‍ताला आलेल्‍या प्रत्‍यक्ष अनुभूतीवर हे नाटक आधारित आहे.

  गजानन महाराजांचे भक्त असलेल्या कुटुंबातील स्वातीचा ( सीमा सायरे ) चा विवाह व्यसनी व नास्तिक मुलाशी ( स्‍वप्‍नील जतकर)ठरतो. नोकरी करून आई (सारिका पेंडसे) व दादा (डॉ. रवी गी-हे) यांचा आधार होण्याची इच्छा असतानाही स्वाती त्या मुलाशी विवाह करते. नवऱ्याकडून अतोनात छळ होत असताना तिची सासू (मिनाक्षी भावे) तिच्या पाठीशी उभी राहते. गजानन महाराजांच्या कृपेने परिस्थितीत कसे परिवर्तन होते आणि कसा सुखांत होतो, हे नाटकात बघण्यासारखे आहे. नाटकात वापरलेल्या ट्रिकस नाटकाची जमेची बाजू असून प्रत्यक्ष गजानन महाराजांचे दर्शन होताच प्रेक्षकातून टाळ्याचा कडकडाट होतो.

  गजानन महाराजांची भूमिका दत्‍ता फडणवीस यांनी केले असून प्रसिद्ध अभिनेते अनिल पालकर यांना बहुरंगी भूमिकेत बघून प्रेक्षक सुखावतात. डॉ. रेणुका जांभोरकर व बाल कलाकार रित्विका तुंबडे, प्रबोधिनी चिपळूणकर यांच्‍याही यात भूमिका आहेत.

  डॉ. जयंत वेलणकर यांच्‍या मार्गदर्शनात सुपरिचित नाट्यलेखक उदयन ब्रम्‍ह यांच्‍या लेखनीतून उतरलेल्‍या नाटकांतील संवाद ताकदीचे आहेत. संजय पेंडसे यांच्‍या दिग्‍दर्शनात तयार झालेल्‍या नाटकांवर त्‍यांच्‍या दिग्‍दर्शन कौशल्‍याची वेगळी छाप शेवटपर्यंत दिसत राहते. सतीश पेंडसे यांनी श्री गजानन महाराजांच्‍या वापरलेल्या ट्रिकस, पालखीचे दृश्य इत्यादी प्रेक्षकांना महाराजांच्‍या अधिक जवळ घेऊन जातात. बाबा खिरेकर यांनी सांभाळलेली रंगभूषेची बाजू इतकी मजबूत आहे की ती गजानन महाराजांचा कालखंड डोळ्यासमोर उभा करते. किशोर बत्‍तासे यांच्‍या दर्जेदार प्रकाश योजना आणि आभास पेंढारी यांच्‍या समर्पक संगीताची जोड नाटकाला लाभलेली आहे.

  या नाटकाचे निर्मिती सूत्रधार अरुणा पुरोहित, निलिमा बावणे, डॉ. रवी गि-हे, दत्‍ता फडणवीस, सारिका पेंडसे व शैलजा पिंगळे आहेत तर निर्मिती सहाय्य चेतन अहिरे, क्षीतिज भोगे, मंगला जोशी, रौनक पळसापुरे व श्रुती सूर्यवंशी यांचे लाभले आहे.

  नाटकाचे पुढचे दोन प्रयोग शनिवार, 10 जानेवारी रोजी दुपारी 2 आणि सायंकाळी 5 वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्‍हील लाइन्‍स येथे होती. प्रवेशिका सभागृहात उपलब्‍ध राहणार आहेत.

  मंगलमय वातावरण निर्माण करेल – नितीन गडकरी
  कोरोनासारख्‍या महामारीच्‍या काळात श्री संत गजानन महाराजांच्‍या जीवनावर आधारित नाटकाची निर्मिती करून समाजात सकारात्‍मक आणि मंगलमय वातावरण पसरवेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केले. या नाटकाच्‍या निर्मितीकरिता त्‍यांनी राधिका क्रिएशन्‍सच्‍या या प्रयत्‍नांचे कौतूक केले. भारतभरात श्री गजानन महाराजांचे लाखो भक्‍त असून हे नाटक त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचवण्‍यासाठी राधिका क्रिएशन्‍सने प्रयत्‍न करावे, लवकरच या नाटकाचे शेकडो प्रयोग होतील आणि नाट्य क्षेत्रालाही नवसंजिवनी मिळेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत नितीन गडकरी यांनी नाटकाच्‍या चमूला शुभेच्‍छा दिल्‍या.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145