Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 2nd, 2021

  महामार्गांवर शून्य अपघातास प्राधान्य : ना. गडकरी

  -खवासा-मोहगाव भागाची ना. गडकरींनी केली पाहणी
  -28 किमी मध्ये वन्य प्राण्यांसाठी 14 ‘अंडरपास’
  -कुरई घाटाच्या एका बाजूची वाहतूक सुरु
  -10 दिवसात सुरु होईल जड वाहतूक

  नागपूर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या खवासा मोहगाव या 28 किलोमीटरच्या कुरई घाटीच्या जवळ सुरु असलेल्या कामाची राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पाहणी केली असून देशातील सर्वच महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यास तसेच शून्य अपघातात प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी सांगितली.

  या 28 किलोमीटरच्या भागामध्ये वन्य प्राण्यांचा अपघात होऊन मृत्यू होऊ नये, त्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा म्हणून 14 ‘अंडरपास’ या महामार्गावर बांधण्यात आले आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अंडरपास बांधल्या जाणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे पूर्वी 200 कोटी रुपये खर्च होणार्‍या या रस्त्यावर आता अंडरपास वाढल्यामुळे 960 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वन्य प्राण्यांसाठीचे 14 अंडरपास 3415 मीटरच्या लांबीचे आहेत. कुरई घाटाच्या एका बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी सुरु झाला असून येत्या 10 दिवसात नियमित वाहतूकही सुरु होणार आहे.

  लोकांची मागणी आणि होत असलेली अडचण लक्षात घेता एका बाजूचा मार्ग सुरु करण्यात आला आहे. गेल्या 1 ऑक्टोबर 2020 ला या भागाचे काम सुरु केले आणि 1 जानेवारी रोजी हा भाग वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला.

  मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर खवासा ते मोहगाव हा 28 किमीचा 4 पदरी महामार्ग पूर्ण झाल्यामुळे प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच पेंच टायगर रिझर्व्हजवळ 9 किलोमीटरच्या भागात वन्य प्राण्याच्या अवागमनाची सुरक्षा निश्चित झाली आहे. या भागाचे काम पूर्ण झाल्यामुळे नागपूर ते रिवा या 500 किमीचे अंतर केवळ 8 तासात पूर्ण करता येणार आहे. पूर्वी एवढे अंतर पूर्ण करण्यास 12 ते 15 तास लागायचे. 28 किमीच्या या भागात 14 अंडरपास वगळता 1 मोठा व 10 लहान पुलांचेही निर्माण करण्यात आले आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.

  या महामार्गावरील अपघात स्थळे शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अपघात रोखण्यास आमचे प्राधान्य आहे. अन्य घटनांनी होणार्‍या मृत्यूंपेक्षा अपघातांमध्ये मृत्यु पावणार्‍यांची संख्या अधिक आहे. दरवर्षी देशात 5 लाख अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. हा रस्त्या चांगला झाल्यामुळे वाहनांचा वेग 100 ते 120 किमी प्रतितास राहणार आहे. त्यामुळे कुणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी एक लिफ्ट लावून रस्त्या ओलांडण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या एप्रिलपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145