Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 23rd, 2021

  प्रजासत्ताक दिनी देशभर निनादणार राष्ट्रगीताचा सूर…

  ”हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत” अभियानाचे देशभरात 85 ठिकाणी आयोजन

  नागपुर – “हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत” या संकल्पनेतून येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. “एक वादळ भारताचं” या चळवळीच्या माध्यमातून 15 आगस्ट व 26 जानेवारी रोजी हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. नागपूर विदर्भासह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश छत्तीसगढ व गुजरात या राज्यातील 85 पेक्षा जास्त ठिकाणांवर हा कार्यक्रम पार पडेल.

  राष्ट्रगीत व राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे संवैधानिक कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेचे जागरण करण्यासाठी पाच वर्षापूर्वी एक वादळ भारताचं ही चळवळ सुरु करण्यात आली. राष्ट्रीय सणांच्या दिवसांचा उपयोग केवळ सुटीसाठी न होता राष्ट्रीय प्रतिकांच्या सन्मानाचा दिवस व्हावा व मनामनात राष्ट्रभावना वृद्धिंगत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे या अभियानाचे मुख्य समन्वयक वैभव शिंदे पाटील यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  शालेय विद्यार्थी व नोकरदार यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र गृहिणी, ज्येष्ठ नागरीक व इतरांना यापासून वंचित रहावे लागते. हेच ओळखून ही चळवळ सुरु करण्यात आली. दरवर्षी सार्वजनीकरित्या हा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोव्हिडच्या प्रकोपामुळे शासन प्रशासनाकडून जी बंधने घालून देण्यात आली आहे. त्याचे पालन करुन नागरीकांनी आपापल्या घरी अंगणात, घराच्या छतावर, सोसायटीत, गल्ली व वस्तीत ध्वजारोहण करुन राष्ट्रगीताचे गायन करावे असे आवाहन एक वादळ भारततर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत 26 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीताचे गायन होणार आहे.

  या कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांची देशभरातून नोंदणी होत असून त्यांच्याकडून गुगल फार्म भरून घेण्यात येत आहेत. आजपर्यंत विदर्भातील नागपूर, तुमसर,उमरेड वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, शेगाव, तेल्हारा, सरंगपूर, काकोडा,देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, म्हसोला, कामारगाव, लाडेगाव, लोहारा, तुकूम,अमरावती मराठवाड्यातील नांदेड, अंबेजोगाई, औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नाशिक, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा व सांगली याठिकाणी हा कार्यक्रम पार पडेल. याशिवाय मुंबईतूनही या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सौंसर आणि जबलपूर तर छत्तिसगढमधील रायपूर याठिकाणी देखिल हा कार्यक्रम पार पडेल. यंदा पहिल्यांदाच गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद याठिकाणाहूनही नोंदणी प्राप्त झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरु होती. सोशल मिडिया या प्रभावी माध्यमाचा उपपोग करुन हे आयोजन यशस्वी करण्यासाठी नियोजनाच्या अनेक वेब बैठका पार पडल्या आहेत.

  एक वादळ भारताचं या चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो. या व्यतिरिक्त वर्षभर भारतीय संविधानाबद्दल जनजागृतीचा कार्यक्रमही शाळा महाविद्यालयांंमध्ये राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत एक वादळ भारताचं या चळवळीचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील विविध कलमे, कायदे, तरतूदी, नागरीकांचे हक्क व अधिकार याबद्दल दृक श्राव्य माध्यमांद्वारे जनजागृती करतात. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन हा देखिल या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145