Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 13th, 2021

  नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणा-यांवर पोलिस कारवाई

  मनपा व पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई : काही तरुणांना अटक

  नागपूर : मकर संक्रांतीच्या पर्वावर नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येत आहेत. मात्र पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणा-या नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झालेले आहेत. नायलॉन मांजाला अडकून शहरातील तीन जणांचा मृत्यूही झालेला आहे. ही अत्यंत दु:खद बाब असून यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा विक्री करणा-यांसह नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणा-यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनपाचे उपद्रव शोध पथक व पोलिस प्रशासनाद्वारे संयुक्त कारवाई सुरू झालेली असून शहरातील काही तरुणांवर बुधवारी (ता.१३) पोलिस कारवाई करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आणि उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात प्रत्येक झोन पथकाद्वारे कारवाई सुरू आहे.

  नायलॉन मांजा कारवाई संदर्भात माहिती देताना मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई करण्यासंदर्भात संपूर्ण नागपूर शहरामध्ये मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे ८१ कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय शहरातील स्वयंसेवी संस्थाही मनपाला सहकार्य करीत आहेत. मात्र शहरातील लोकसंख्येचा विचार करता ही संख्या तोकडी आहे. त्यामुळे या सर्वप्रक्रियेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. समाजात नायलॉन मांजाच्या वापर न करण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगावे. सुती मांजाचा वापर करून पतंग उडवित असले तरी गर्दीच्या ठिकाणी टाळावे. बाहेर मैदानातच पतंग उडवावी. रस्त्यावर मांजा अडकणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

  मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रोजच नायलॉन मांजा संदर्भात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १७८ नायलॉन मांजा चक्री जप्त करून जवळपास ६३ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मांजामुळे अनुचित घटना घडू नयेत यासाठी मनपाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीनेही नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. या बाबत कारवाईसाठी मनपाचे पोलिस प्रशासनासोबत प्रयत्न सुरूच आहेत. नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून मनपाला सहकार्य करावे. कुठेही नायलॉन मांजाची विक्री आढळल्यास किंवा त्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास त्वरीत त्याची माहिती मनपाच्या झोन कार्यालयात किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये द्यावी, असेही आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

  उपद्रव शोध पथकाव्दारे १३ जानेवारी ला २४०० रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच २७८० पतंगसुध्दा जप्त करण्यात आली आहे. पथकाने १६७ चक्री जप्त केली आणि ५०४ दूकानांची तपासणी केली.

  महापौरांनी शहरात सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. नायलॉन मांजा संदर्भात शहरात घडत असलेल्या दुर्घटना दुर्दैवी आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा संदर्भात कारवाईला गती देउन नागरिकांना तसेच तरुणांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच त्यांनी मांजापासून वाहनचालकांच्या सुरक्षतेसाठी उडडाण पुलांवर तार लावण्याचे आदेशही दिले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145