लुप्त होत असलेल्या प्रजातींच्या झाडांची लागवड करा
जैवविविधता समितीची बैठकीत सदस्यांची सूचना
नागपूर : नागपूर शहरात झाडांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र काही भारतीय प्रजातींची झाडे शहरातून लुप्त होत आहे. अशा लुप्त होत चालेल्या झाडांची लागवड नागपूर शहरातील उद्यानांत तसेच रस्त्यांच्या दुतर्फा करण्याची सूचना जैव विविधता समितीच्या सदस्यांनी केली.
नागपुरातील जैव विविधता समितीची बैठक नुकतीच समितीचे सदस्य दिलीप चिंचमलातपुरे यांच्या जयताळा चौक येथील निवास परिसरातील संग्रहालयात पार पडली. बैठकीला समितीच्या अध्यक्ष नगरसेविका दिव्या धुरडे, सदस्य सोनाली कडू, नगरसेवक निशांत गांधी, दिलीप चिंचमलातपुरे, उपायुक्त तथा उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते उपस्थित होते.
यावेळी समितीचे सदस्य दिलीप चिंचमलातपुरे यांच्या संग्रहालयातील विविध जैवविविधतेची यावेळी सदस्यांनी पाहणी केली. त्यांच्याकडे असलेल्या विविध प्रजातींची झाडे, जैवविविधता पुस्तकांच्या संग्रहाचे सदस्यांनी अवलोकन केले. नागपूर शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर शोभीवंत फुलझाडे लावून रस्त्यांच्या तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचेही यावेळी बैठकीत सदस्यांनी सुचविले.
समितीच्या अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी जैवविविधता समितीची सभा दर १५ दिवसांनी घेण्याचे निर्देश दिले. पुढील सभेच्या वेळी भांडेवाडी येथील नियावाकी पद्धतीने केलेल्या वृक्ष लागवडीला भेट देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.