| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 23rd, 2020

  कचऱ्याचे ढिगारे उचला; अन्यथा अधिकाऱ्यांना ठोठावणार दंड

  कार्यकारी महापौर संदीप जोशी यांचा इशारा

  नागपूर : शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. घराघरातून कचरा संकलित केला जावा यासाठी मनपाने दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. स्वच्छतेमध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई दिसून आल्यास संबंधित सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते. मात्र यासाठी संबंधित अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे आता शहरात कचऱ्याचे ढिगारे दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा कार्यकारी महापौर संदीप जोशी यांनी दिला.

  नागपूर शहर स्वच्छ, सुंदर दिसावे यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्येही पिछाडीवर असलेले नागपूर शहर आता बरेच पुढे आले आहे. हा दर्जा पुढे आणखी सुधारला जावा यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशासनीक स्तरावर उत्तम अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जेवढी स्वच्छता कर्मचाऱ्यांची आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांचीही आहे.

  शहर विकासाच्या दृष्टीने दहा झोनमध्ये शहराची विभागणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने स्वच्छतेचेही कार्य झोननिहाय उत्तम होणे अपेक्षित आहे. मात्र आज शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसत आहेत. योग्य पद्धतीने कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन व्हावे यासाठी मनपाद्वारे बीव्हीजी आणि एजी एन्व्हायरो या दोन एजन्सी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.

  शहरातील कुठल्याही भागामध्ये कचऱ्याचे ढिगारे राहू नयेत यासाठी सर्व कचरा ट्रान्सफर स्टेशन बंद करण्यात आले. कचरा संकलित केलेल्या छोट्या वाहनातील कचरा थेट मोठ्या वाहनांमध्ये लादून तो प्रक्रियेसाठी पाठविण्याची यंत्रणा शहरात सुरू आहे. मात्र तरीही शहरातील काही ठिकाणे कचराघर बनत चालले आहे. प्रशासनाणे उदासिनपणा आणि कामचुकारपणा सोडून प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असाही इशारा कार्यकारी महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145