| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 26th, 2021

  मनपा अग्निशमन विभागाचे स्था. स्थानाधिकारी धर्मराज नाकोड यांना राष्ट्रपती पुरस्कार


  नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत. यंदाच्या राष्ट्रपती पदकाच्या यादित नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे सहायक स्टेशन अधिकारी धर्मराज नाकोड यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक (अग्निशमन सेवा पदक) जाहीर झाले आहे. ते ३० नोव्‍हेंबर २०२० रोजी आपल्या सेवेतून निवृत्त झाले होते.

  परिचय : धर्मराज नारायणराव नाकोड यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९६२ रोजी झाला. त्यांनी नागपूर अग्निशमन सेवेत फायरमन म्हणून सेवा कारकीर्दीची सुरूवात ७ जुन १९८४ पासून केली. १६ नोव्‍हेंबर २०११ रोजी त्यांना अग्निशमन दलाच्या लिडींग फायरमन पदावर बढती देण्यात आली. त्यानंतर त्यांना ८ जून २०१७ रोजी सब ऑफीसर हे पद मिळाले. परत २१ जुन २०१९ रोजी त्यांची सहायक स्टेशन अधिकारी या पदावर बढती झाली. तसेच त्यांच्याकडे नरेंद्र नगर फयर स्टेशनचा सुध्दा अरितिक्त भार होता.

  धर्मराज नाकोड यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातून राज्यशास्त्र आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. तसेच धर्मराज नाकोड यांनी नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज मधून ‘स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर’ नावाचा कोर्स पूर्ण केला. सोबतच नाकोड यांनी नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेजमधून १० विविध प्रशिक्षण पूर्ण केले. २००३ च्या ४१ ‘ॲडव्हान्स रेस्क्यू कोर्स’ मध्ये त्यांना गोल्ड मेडल देण्यात आले.

  अग्निशमन विभागाच्या इतर सदस्यांसाठी ते एक प्रेरणादायक बचावकर्ता म्हणून राहीले आहेत. त्यांनी गंभीर घटनेच्या वेळी प्रचंड धैर्याने संकटांचा सामना केला. आणि म्हणूनच आज सर्व अग्निशमन सेवेतील सदस्य त्यांचा दाखला देतात. धर्मराज नाकोड हे अत्यंत शिस्तप्रीय आहेत उत्कृष्ट प्रशासकीय क्षमता असलेले व्यक्तिमत्व आहे.

  आपल्या सेवाकाळात त्यांनी मॉक ड्रिल, लेक्चर्स, लाइव्ह फायर प्रात्यक्षिकेसारख्या सेव्हरल फायर सेफ्टी अवेयरनेस प्रोग्राम आयोजित केले. तसेच नव्याने भरती केलेल्या अग्निशामक कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचेही कार्य त्यांनी केले आहे.

  धर्मराज नाकोड यांनी इमारत तपासणी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यात त्यांनी मल्टीप्लेक्स, मॉल, रुग्णालय, शाळा, गोडाऊन इत्यादी गगनचुंबी व विशेष इमारतीची तपासणी केली आहे.

  नाकोड यांनी केलेले कार्य
  – २००१ साली गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या मोठ्या भूकंपाच्या वेळी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने धर्मराज नाकोड यांना शोध व बचाव मोहीमेत तैनात करण्यात आले होते.

  – २०१२ मध्ये राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाच्या निमित्ताने तत्कालिन महापौरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याच वर्षी ३ डिसेंबर रोजी बहूमजली कोल्ड स्टोरेज बिल्डिंग कोसळलेल्या ठिकाणी त्यांनी बचाव कार्याचे नेतृत्व केले व मोडकळीस आलेल्या इमारतीत घुसून त्यांनी ४ लोकांचे प्राण वाचवले.

  – त्यानंतर त्यांच्या कार्याचे विविध व्यासपीठावर कौतुक झाले आणि सन २०१३ साली नाशिक येथे किंग्ज इन्फोमेडिया (पी) लिमिटेड आणि नाशिक महानगरपालिकेद्वारे आयोजित कार्यक्रमात ‘सेफ इंडिया हिरो प्लस अवॉर्ड’ देउन नाकोड यांना सन्मानित करण्यात आले.

  – २०१६ साली त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात शेताच्या खुल्या बोरवेलमधून एका मुलाला सुखरूप बाहेर काढले होते, तेव्हा गोंदियाच्या तत्कालीन जिल्हाधिका-यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

  – ९ डिसेंबर २०१८ रोजी जागन्नाथ बुधवारी येथील सूत गिरणीला लागलेल्या आगीच्या घटनेत त्यांनी बचाव पथकाचे नेतृत्व केले आणि हायड्रॉलिक कटिंग आणि ब्रेकिंग साधनांचा वापर करून धुराच्या आत तीन मजल्यावरील अडकलेल्या २ महिलांचे प्राण वाचवले.

  ३६ वर्षाच्या कार्यकाळात नाकोड यांचे उच्च शिस्तीचे प्रदर्शन : राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी
  मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी धर्मराज नाकोड यांचे कौतुक केले. राजेंद्र उचके म्हणाले, नाकोड यांनी आपली कर्तव्ये कुशल कार्यक्षमतेने पार पाडली, त्यांच्या संपूर्ण सेवाकार्यात त्यांनी जबाबदारीची, समर्पण आणि चांगल्या आचरणाची भावना दर्शविली आहे. ते प्रामाणिक मेहनती आणि आपल्या सेवेला समर्पित कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी आपल्या ३६ वर्षांच्या सेवा कारकिर्दीत धैर्य, अदम्य सहास आणि उच्च शिस्तीचे प्रदर्शन केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145