| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jan 7th, 2021

  टाळेबंदीत रेल्वेने शोधले उत्पन्नाचे नवे मार्ग

  – रोजगाराचे नवे पर्याय, नागरिकांनाही लाभ , कोळशाची राख, डोलामाईट, साखर, तांदळाची वाहतूक

  नागपूर– कोरोनाच्या पृष्ठभूमीवर देशभरात टाळेबंदी आणि संचारबंदी करण्यात आली. प्रतिष्ठाने, उद्योग, कंपन्या आणि परिवहन व्यवस्था ठप्प होती. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था थांबली. अनेकांचा रोजगार बुडाला. काही जणांचा मृत्यू झाला. एका कोरोनाने जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न साèयांसमोर उभा केला. मात्र, कोरोनाची दुसरी बाजू सुद्धा आहे. टाळेबंदीने रोजगाराचे नवे पर्याय आणि उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात मदत केली. जगण्याची नवी दिशा दिली आहे.

  टाळेबंदीच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. मात्र याच काळात रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधून काढले. कधी काळी मालगाडीने केवळ कोळशाचीच वाहतूक केली जायची. टाळेबंदीच्या काळात रेल्वेने उत्पन्नाचे नव मार्ग शोधले. ज्या वस्तूंची कधीच वाहतूक झाली नाही अशा वस्तूंची पहिल्यांदाच वाहतूक करण्यात आली. यात कोळशाची राख, डोलामाईट, साखर, तांदूळ, कापूस, संत्री आणि रेतीचा समावेश आहे. याशिवाय ट्रॅक्टर, लोखंड, स्टील, तेल, तेल बिया पहिल्यांदाच नव्या ठिकाणी पाठविण्यात आले. प्रवासी वाहतूक बंद असली तरी नव्या मालवाहतुकीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडली.

  रेल्वेची धडधड… प्रवाशांची वर्दळ… भारवाहकांची लगबग… विक्रेत्यांचे आगळेवेगळे आवाज आणि उद्घोषणा ज्या ठिकाणी सुरू असते, ते नागपूर रेल्वेस्थानक २४ मार्च २०२० ला शांत झाले. रेल्वेची चाके थांबली. रेल्वेस्थानक निर्जन झाले. अशा विपरीत स्थितीत अर्थव्यवस्था टिकवून ठेवणे रेल्वे समोर आव्हानच होते. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने यावर मात करीत नवे उत्पन्नाचे नव मार्ग शोधून काढले. उपरोक्त वस्तूंची वाहतूक आता नियमित झाली आहे. प्रवासी वाहतुकीचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावर झाला असला तरी नव्या मालवाहतुकीमुळे रेल्वेला नवी दिशा मिळाली आहे.

  पहिल्यांदाच किसान रेल चालविल्याने संत्रा उत्पादकांना दिलासा मिळाला. याशिवाय पालेभाज्या, औषधींची वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीमुळे रेल्वेला उत्पन्न तर मिळाले शिवाय कमी वेळात अधिक माल पोहोचत असल्याने नागरिकांना संत्र्याची चव चाखता आली. पर्यायाने शेतकèयांना लाभ होत आहे.

  कुल्हड वापरण्यावर भर
  रेल्वे मंत्रालयाने रेल्वेमध्ये चहा पिण्यासाठी कुल्हड वापरण्यावर भर दिला. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर चिनी मातीच्या भांड्यात चहा पिण्याविषयी शंका घेतली जाते. पर्याय म्हणून प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला. आता आरोग्यास हानिकारक म्हणून प्लॅस्टिकलाही नकार दिला जातो. त्यामुळे अलिकडे रेल्वेस्थानकावर मातीच्या भांड्यात चहा देण्यास सुरुवात झाली आहे.

  मोतीबागेत पहिल्यांदाच कोच दुरुस्ती
  एलएचबी कोचची रेल्वे लागोपाठ ३६ महिने धावल्यानंतर देखभाल आणि दुरुस्ती आवश्यक आहे. नागपुरात केंद्र नव्हते, त्यामुळे दुरुस्तीसाठी परप्रांतात पाठविले जायचे. त्यासाठी वेळ जायचा आणि खर्चही मोठ्या प्रमाणावर व्हायचा. आता मात्र एलएचबी कोचची देखभाल, दुरुस्ती नागपुरातच होत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने मोतीबाग येथील कारखान्यात दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

  मुखाच्छादन बनविण्याचा रोजगार
  टाळेबंदीने अनेकांचे रोजगार हिरावले. सोबतच नवीन रोजगाराचा मार्गही मिळाला. यात मुखाच्छादन तयार करून विकण्याचा व्यवसाय आता तेजीत आला आहे. मुखाच्छादनाशिवाय घराबाहेर पडल्यास दंड आहे. त्यामुळे प्रत्येक जण मुखाच्छादन वापरतो. पर्यायाने मुखाच्छादनाचा मोठा व्यवसाय झाला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145