Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 21st, 2020

  नागपुरकरांनी अनुभवला दिव्यांगाचा सामाजिक सोहळा

  पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आशीर्वाद

  नागपूर: ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा व मानस पुत्र चि. समीर यांचा शुभ विवाह आज सदभावना हॉल, पोलीस लाईन्स टाकळी येथे संपन्न झाला. अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती आणि सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आशीर्वादात अतिशय थाटात हा विवाह सोहळा पार पडला.

  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वधू पिता म्हणून कु. वर्षा हिचे कन्यादान केले. अनिल देशमुख व सौ. आरती देशमुख यांनी वधू पिता म्हणून वर पक्षाचे स्वागत केले तर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ. जोत्सना ठाकरे यांनी वर पिता म्हणून चि. समीरची जबाबदारी घेतली होती.

  विवाह सोहळ्यास जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊन यांनी आवर्जून हजेरी लावली व वधुवरास आशीर्वाद दिला. यावेळी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री विकास ठाकरे, मोहन मते, विकास कुंभारे, रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी मंत्री अनिस अहमद, रणजित देशमुख, रमेश बंग, सतिश चतुर्वेदी, माजी खासदार दत्ता मेघे, गिरीश गांधी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा माधुरी चिडके-वैद्य, सलिल देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  आज विवाह झालेल्या कु. वर्षा हिला शंकरबाबा पापडकर यांचे पितृछत्र मिळाले आहे. अमरावती जिल्हयातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादासपंथ वैद्य मतीमंद, मुकबधीर अनाथालयात 23 वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलीसांना सापडलेल्या वर्षाचे शंकरबाबा यांनी आईवडीलाप्रमाणे सांभाळ करुन तिला वडीलाचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे केले.

  तर डोंबीवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरला सुध्दा शंकरबाबा पापडकरांनी स्वत:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली. बालगृहातील कु. वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर समीरला शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी अनुक्रमे वधुपिता व वरपित्याची भूमिका घेत आजच्या विवाह सोहळयासाठी पुढाकार घेतला. शंकरबाबा पापडकर यांनी पुढाकार घेवून केलेल्या दिव्यांगाचा हा 24 वा विवाह आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145