| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 3rd, 2020

  नागपूर पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

  नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली.

  निवडणूक निरीक्षक एस.वी.आर. श्रीनिवास, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्यासह विभागातील सहा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मतमोजणीशी संबंधित विविध अधिकारी उपस्थित आहेत.

  पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एकूण 1 लाख 32 हजार 923 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 64.38 आहे.

  मतमोजणी चार कक्षात 28 टेबलवर होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.

  सध्या टपाल पत्रिके नंतर मतपेटीद्वारे झालेले मतदान एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व मतपत्रिका एका हौदात एकत्रित करण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145