Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Jan 18th, 2021

    मनपाच्या विद्यार्थ्यांना ‘जेईई’ व ‘नीट’ चे कोचिंगसाठी पुढाकार घ्यावा

    महापौर दयाशंकर तिवारी यांची कोचिंग इन्स्टिट्यूटला सूचना

    नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. बारावीपर्यंत मनपाच्या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अनेकदा परिस्थितीमुळे व मार्गदर्शनाअभावी ते स्वत:ची स्वप्न पूर्ण करू शकत नाही. मनपाच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या संकल्पनांच्या पंखांना बळ मिळेल व ते सुद्धा इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या २५ -२५ विद्यार्थ्यांना शहरातील कोचिंग इन्स्टिट्यूटद्वारे नि:शुल्क ‘जेईई’ व ‘नीट’चे कोचिंग देण्याची सूचना केली. या संकल्पनेला शहरातील सर्व कोचिंग इन्स्टिट्यूटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापौरांच्या या संकल्पना आणि पुढाकारामुळे मनपाच्या शाळेमध्ये शिकणारे प्रतिभावंत गरीब व गरजू विद्यार्थी आता आपली स्वप्ने पूर्ण करू शकतील, हे विशेष.

    नागपूर शहरातील कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याबाबत ‘इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग असोसिएशन’द्वारे महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनासंदर्भात चर्चा करण्याबाबत सोमवारी (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, ‘इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग असोसिएशन’चे अध्यक्ष रजनीकांत बोंदरे, कोषाध्यक्ष समीर फाले, महेश अंधारे, डॉ. मनोज तावानी, जयंत गणवीर, इजाज शेख, जयदीप अग्रवाल, नरेंद्र वानखेडे, राहुल राय, सोनू बुर्रेवार आदी उपस्थित होते.

    यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना ‘जेईई’ व ‘नीट’चे नि:शुल्क कोचिंग देण्याच्या महापौरांच्या संकल्पनेवर ‘इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग असोसिएशन’च्या पदाधिका-यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण उपक्रम चालविण्यात येणार आहे. कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल असोसिएशनने आभार मानून नि:शुल्क कोचिंग संदर्भात असोसिएशन मनपासोबत ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145