Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Sat, Jan 30th, 2021

    महिलांच्या दारूबंदी आंदोलनाची आमदार मेघेंनी घेतली दखल

    महिलांच्या दारूबंदी आंदोलनाचा असर, आमदार मेघे गावात दाखल

    नागपूर – गट ग्रामपंचायत मांगली हद्दीतील नागपूर-वर्धा जिल्हा सीमेवरील दारूचे दुकान बंद करण्याकरिता स्थानिक महिलांनी २२ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढुन दारूबंदीचा एल्गार पुकारला होता, याविषयीची बातमी वृत्तपत्रात प्रकाशित होताच आमदार समीर मेघे यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची सभा घेतली.

    गट ग्रामपंचायत मांगली येथील ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी कोरोनाच्या आडून ग्रामस्थांना कोणतीही पुर्वसूचना न देता, ग्रामसभा व महिला सभा न घेता 21 जुलै 2020 रोजी परस्पर ठराव घेऊन गट ग्रामपंचायत मांगली हद्दीत मौजा कवठा येथे नागपूर-वर्धा जिल्हा सीमेवरील दारूचे दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने येथील दुकानात मोठी गर्दी असते. या दुकानामुळे असामाजिक तत्वांना ऊत येत असून ग्रामवासीयांना अनेक सामाजिक, आरोग्यदायी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    कायदा हातात न घेण्याचे आवाहन
    आमदार मेघेंनी ग्रामस्थ आणि महिलांशी दारूच्या दुकानाच्या समस्येबाबत चर्चा केली. दारूचे दुकान बंद करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी मेघे यांनी दिले. याकरिता येत्या सोमवारी गावातील महिलांचे शिष्टमंडळ व आमदार समीर मेघे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची भेट घेऊन लवकरात लवकर पुढील कारवाई करून ही समस्या मार्गी काढणार असे ठरले आहे. तसेच ग्रामस्थांनी कायदा हातात घेऊन काही गैर कायदेशीर कृत्य करू नये असे आवाहन केले.

    गावातच प्रथमच बिनविरोध निवडणूक
    विशेष हे की, २०१९ मध्ये गावात निवडणूक न घेता ग्रामवासियांनी बिनविरोध पद्धतीने तत्कालीन सरपंच यांच्या पत्नीची सरपंचपदी निवड केली होती. ग्रामपंचायत कार्यकारिणीने इतका मोठा ठराव परस्पर घेऊन ग्रामस्थांशी विश्वासघात केला. असा आरोप ग्रामवासियांनी केला आहे. ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करून या प्रकरणाची संपूर्ण निष्पक्षपातपणे चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145