| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Dec 19th, 2020

  दलित महिलांवरील अत्याचाराच्या घटनांसंदर्भात महाराष्ट्र सरकार असंवेदनशील

  भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा आरोप


  नागपूर : महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे एका मुकबधिर असलेल्या दलित तरुणीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या पूर्वसंधेला ९ डिसेंबरला राज्यात ही घटना घडली मात्र दलित अत्याचाराच्या इतर घटनांप्रमाणेच या घटनेवरही राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे मूग गिळून गप्प बसले आहे. राज्यात होणाऱ्या दलित महिलांवरील अत्याचाराच्या घटनांसंदर्भात महाविकास आघाडी सरकार हे अंवेदनशील आहे, असा आरोप भाजपा प्रदेश सचिव तथा नागपूर महानगरपालिकेचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.

  बिलोली येथील सुनीता नबाजी कुडके या २७ वर्षीय मुकबधिर निराधार दलित तरुणीवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे दगडाने ठेचून हत्या झाली. ही घटना समाजमन सुन्न करणारी आहे. यापूर्वीही राज्यात दलित महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील असहाय्य निराधार तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुळात राज्यातील सरकारचे या घटनांकडे लक्ष नाही. यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील घटनेच्या संदर्भात शासनाने तोंडातून एक अक्षरही काढले नव्हते आजही शासन मूक भूमिका घेउनच आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवरही सरकार ढिम्मच राहणार असेल तर मग राज्यातील दलित सुरक्षित आहेत का, असा प्रश्नही यावेळी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी उपस्थित केला.

  आनंद शर्मा यांनी ओढले महाराष्ट्र सरकारचे कान
  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय समितीनेही महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेतील समितीने नुकतेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे कान ओढले आहेत. महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या तसेच महिला गायब होण्याच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यावर राज्यातील सरकारकडून कुठल्याही प्रकारची कडक कारवाई केली जात नसल्यावर समितीने नाराजी दर्शविली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर राज्यात ‘शक्ती’ कायदा आणला.

  मात्र तो फक्त दाखविण्यापूरतेच आहे. हे सरकारचे ढोंग आहे. प्रत्यक्षात सरकाची दलितांच्या प्रश्नांसंबंधी, अत्याचारासंबंधी मूक भूमिकाच राहिली आहे व आजही तिच भूमिका दिसून येत आहे. सरकार गंभीर नसल्यामुळे महिला व दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचा तीव्र निषेध करून सरकारने वेळीच कठोर पायबंद घालण्याची मागणीही भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145