‘महाज्योती’ सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे नेणार : डॉ. बबनराव तायवाडे
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान : समाजकार्यकर्त्यांचा सत्कार
नागपूर: समाजतील वंचित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी एकत्र येऊन स्वत:ची ओळख तयार करावी. शासनाच्या योजनांची माहित करून त्याचा लाभ घ्यावा. याच घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वातसा ‘महाज्योती’च्या निमित्ताने शासन पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ‘महाज्योती’चे संचालक डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आयोजित व्याख्यान आणि सत्कार सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून केले. यावेळी अतुल लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या वंदना वनकर, ॲड. रेखा बाराहाते, डॉ. अंजली साळवे, श्री. वाघमारे, कार्यकारी अधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते.
यावेळी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी ‘महाज्योती’च्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपक्रमांची माहिती दिली. अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी, जेईई, एनईईटी प्रवेश परीक्षेची ऑनलाईन तयारी, पोलिस भरतीपूर्व ऑनलाईन मार्गदर्शन यासाठी १० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग या समाजघटकांसाठी महाज्योती कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत राज्यभरातून साडे चार हजारांवर प्रवेशिका प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या वंदना वनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्मिक विवेचन केले. प्रमुख वक्त्या ॲड. रेखा बाराहाते आणि डॉ. अंजली साळवे यांनी ‘सावित्रीबाई आणि आजची स्त्री’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अतुल लोंढे यांनी महाज्योतीच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी योग्य मार्केटिंग करावी, अशी सूचना केली. श्री. वाघमारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन दिव्या शहारे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन महाज्योतीचे समन्वयक उमेश कोर्राम यांनी केले.
तीन महिला समाजकार्यकर्त्यांचा सत्कार
कुठलीही प्रसिद्धी न करता आपआपल्या क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या तीन महिलांचा यावेळी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या छायाताई कुरुटकर, निता इटनकर, रंजना सुरुजुसे यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
निबंध स्पर्धेत सातार जिल्ह्यातून ज्योती साळुंखे प्रथम
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘महाज्योती’च्या वतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यभरातून सुमारे साडेचार हजारांवर निबंध प्राप्त झाले. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून सर्वप्रथम सातारा जिल्ह्याचा निकाला जाहीर करण्यात आला. यात ज्योती कुणाल साळुंखे (कला, वाणिज्य महाविद्यालय नागठाणे, जि. सातारा) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक निकीता राजाराम भगत (मुधोजी महाविद्यालय, फलटण जि. सातारा) तर तृतीय क्रमांक वैभव रामचंद्र शिवतारे (सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, खंडाळा जि. सातारा) ह्याने प्राप्त केला. अन्य जिल्ह्याचे निकाल जिजाऊ जयंती आणि युवा दिनाचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येतील, अशी माहिती समन्वयक उमेश कोर्राम यांनी दिली. स्पर्धेचे जिल्हानिहाय बक्षीस वितरण २६ जानेवारी रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येतील.