रस्ता अडविल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
धामणगाव येथील प्रकार : तहसीलदारांचा आदेश धुडकावला
नागपूर : काटोल तालुक्यातील धामणगाव येथील एका शेतकऱ्याने शेजारील शेतकऱ्यांच्या रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यासमोर शेतीमध्ये ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत काटोल तहसील कार्यालयात तक्रार केली असता, तहसीलदारांनी संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले. मात्र, संबंधित शेतकऱ्याने अजूनही रस्ता अडवलेलाच आहे.
सत्यफुला महादेव वरठी, रामराम महादेव गजाम, रामचंद्र गोदबा नरपाची, पुंडलिक लक्ष्मण राऊत, अंकुश लक्ष्मण राऊत आणि नत्थू चंपत वरठी यांची धामणगाव शिवारात शेती आहे. या सर्व शेतकऱ्यांचा मीराबाई रामदास कुहिके यांच्या शेतालगत (स.नं. २३७/२) बैलबंडीचा रस्ता आहे. मीराबाई कुहिके यांनी त्यांच्या शेतीलगत असलेल्या ०.९१ हे. आर. क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर ताबा मिळविला आहे. शेतीच्या धु-यासह शासकीय भूखंडावरील रस्ता कुहिके यांनी अडविला असल्यामुळे इतर शेतकऱ्यांना आपापल्या शेतावर जाता येत नाही. हल्ली कापूस वेचणी तसेच रब्बी हंगामाची कामे सुरू आहेत.
परंतु, या शेतकऱ्यांना शेतावर जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यासंदर्भात मीराबाई कुहिके यांच्याविरुद्ध काटोल येथील तहसीलदाराकडे तक्रार केली होती. तहसीलदारांनी २८ जून २०१९ रोजी मीराबाई कुहिके यांना वहिवाटीसाठी इतर शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले. मात्र, अजूनही रस्ता मोकळा झालेला नाही. दरम्यान हे प्रकरण नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. मात्र, कोरोना काळामुळे यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने इतर शेतकऱ्यांचा शेतामध्ये ये-जा करण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे.