| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 16th, 2020

  मुंबई लोकमतचे श्री दिनकर रायकर यांना जीवन गौरव पुरस्कार

  {विविध विषयांवर काम करणाऱ्या इतर ८ मान्यवरांना विशेष पत्रकारिता पुरस्कार}


   
  पत्रकारितेच्या क्षेत्रात राहून समाजात जाणीवजागृती निर्माण करणाऱ्या तसेच समाजातील वंचितांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी सक्रीय योगदान करणाऱ्या पत्रकारांना मागील दशकापेक्षा अधिक काळापासून अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविले जाते. महाराष्ट्र व राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारितेतील मान्यवरांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठान १९९९ पासून पुरस्कार प्रदान करीत असते. २०१६ मध्ये राजभवन, मुंबई येथे मा. राज्यपाल श्री. विद्यासागर राव व तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच २०१९ मध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण शौरी यांचे हस्ते नागपूर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
   
  “मा. श्री. रणजीतबाबू देशमुख महाराष्ट्राचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. २९ मे २०२१ ला त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे. आमचे आजोबा स्व. श्री. अरविंदबाबू देशमुख यांच्या नावाने आम्ही १९९९ पासून विदर्भ स्तरावर पत्रकारिता पुरस्कार सोहळा आयोजित करीत होतो. पुढे हा पुरस्कार महाराष्ट्रापर्यंत देण्यात येत आहे. या अमृत महोत्सावानिमित्या ज्युरींच्या निवड समितीकडून वेगवेगळ्या विषयांवर इलेक्ट्रोनिक मिडिया आणि प्रिंट मिडियात कार्यरत नामवंत पत्रकारितेतील व्यक्तिमत्वाचा सन्मान करीत आहोत.

  यामध्ये जीवन गौरव पुरस्कार हा यावर्षी मा. श्री. दिनकर रायकर, सल्लागार संपादक, लोकमत, मुंबई यांना जाहीर करीत आहोत. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि सत्कार असे आहे. इतर विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोख राशी, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे जाहीर करण्यात येत आहे. सर्वश्री संजय आवटे (दिव्यमराठी, औरंगाबाद) ३१ हजार, निलेश खरे (साम टीव्ही, मुंबई) ३१ हजार, विश्वास वाघमोडे (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई) २१ हजार, राधेश्याम जाधव (हिंदू बिझनेस लाईन, पुणे) २१ हजार, तुषार खरात (लय भारी, मुंबई) २१ हजार, देवेंद्र गावंडे (लोकसत्ता, नागपूर) २१ हजार, सौ. मेघना ढोके (लोकमत, नाशिक) २१ हजार, महेंद्र महाजन (सकाळ, नाशिक) २१ हजार यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार कार्यक्रम पत्रकारितेतील राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ समाजसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये नागपूर येथे साकार करण्यात येईल”, अशी माहिती माजी आमदार व अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांनी दिली. दि. १६.१२.२०२० ला प्रेस क्लब, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे अध्यक्ष मा. श्री. रणजीतबाबू देशमुख, कार्यवाह प्रा. श्री. जवाहर चरडे आणि प्रा. श्री. युवराज चालखोर यावेळी पत्र परिषदेला उपस्थित होते.          

  मा. श्री. दिनकर रायकर, सल्लागार संपादक, लोकमत, मुंबई यांचा संक्षिप्त परिचय:-
  ४० वर्षांचा इंग्लिश व मराठी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य.दैनिक लोकमत, लोकमत टाईम्स, इंडियन एक्स्प्रेस येथे संपादक म्हणून कार्य.
  मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष.सामाजिक व राजकीय क्षेत्रावरील लिखाणामुळे स्वत:चे वेगळे अस्तित्व.

  राजकीय बीट  सोबतच व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ व विविध चलवळीसह आयएएस/ आयपीएस अधिकाऱ्यांवरही लिखाण केले. 
  दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, सिंगापूर, युरोप, मलेशिया, अमेरिका येथे भेटी.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145