महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानाचा प्रारंभ ऊर्जामंत्रांच्या हस्ते शेतकऱ्यांना मागणीपत्र प्रदान
नागपूर,दि. २७ जानेवारी २०२१: कृषी ग्राहकांना ३० ते ६० दिवसात वीज जोडणी,कृषी ग्राहकांच्या थकीत वीज बिलांवर १५ हजार कोटींची सवलत,सौर कृषी वाहिनी द्वारे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास अखंडित वीज पुरवठा देण्याचे लक्ष्य, पाच वर्षात ५ लाख सौर कृषी पंपांचे वाटप अशा महत्वपूर्ण व महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा कायापालट करण्याची क्षमता असणाऱ्या महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानाचा प्रारंभ २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी करण्यात आला. यानिमित्त नागपूर परिमंडलातील १६ शेतकऱ्यांना ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी मागणीपत्र प्रदान करण्यात आले.
कस्तुरचंद पार्क येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते नागपूर परिमंडलातील बबन काटोले, आनंद सदावर्ते, विमल बानाईत, नरेंद्र बागडे,सुमन कठाने, मीना कठाने, नामदेवराव भारस्कर, भय्यालालजी नाईक मनोज रामटेके,रमेश चव्हाण,पुरुषोत्तम भावपूरकर,जोगेश सावल, दयाराम सातपुते,संगीत राऊत, भालचंद्र किंमतकर व मंगला इटनकर या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी मागणीपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार,जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे,शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे,कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी मागणी पत्र स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांशी प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सवांद साधला. या शेतकऱ्यांना महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाची माहिती दिली. तसेच नवीन जोडणी साठी कुठलीही अडचण आल्यास त्याचे तात्काळ निवारण करण्यात येइल,, अशी ग्वाही दिली. या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पैसे भरून वीज जोडणी घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहनही सुहास रंगारी यांनी यावेळी केले.