| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 8th, 2021

  सिकल सेल रुग्णांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरु करा : महापौर दयाशंकर तिवारी

  महापौर ‘ॲक्शन मोड’वर : मनपा मुख्यालयात उघडणार गरीब रुग्णांसाठी ‘सहायता कक्ष’

  नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मनपाचे पाचपावली सुतिकागृह येथे सिकल सेल रुग्णांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

  श्री. दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (८ जानेवारी) आरोग्य विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीमध्ये उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती श्री. वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी,कार्यकारी अभियंता श्रीमती सोनाली चव्हाण उपस्थित होते. महापौरांनी गुरुवारी (८ जानेवारी) ला पदभार सांभाळल्यानंतर महापौर ‘ॲक्शन मोड’ वर आले असून त्यांनी प्रलंबित आणि नवीन विषयांवर निर्णय करण्यासाठी बैठकींना सुरुवात केली आहे.

  बैठकीत महापौरांनी सांगितले की, आरोग्य विभागाने सिकल सेल ‘डे केअर सेंटर’ उघडण्यासाठी सखोल अभ्यास करुन प्रस्ताव तयार करावा. यासाठी सिकल सेल सोसायटीची सुध्दा मदत घेण्यात यावी. त्यांनी सिकल सेल रुग्णांसाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याचा सुद्धा सल्ला दिला.

  महापौरांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी मनपा मुख्यालयात ‘सहायता कक्ष’ उघडण्याचे निर्देश दिले. महापौरांनी प्रस्तावित २७ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र आणि १० नागरी सामुदायिक आरोग्य केंद्राबद्दल माहिती घेतली. अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, दोन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रांना मिनीमातानगर आणि नारी मध्ये उघडण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यासाठी निधी ही मंजूर झाला आहे. महापौर श्री. तिवारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक केंद्राच्या कार्याला लवकरात-लवकर प्रारंभ करण्यासाठी निर्देश दिले.

  महापौरांनी सामाजिक संस्थाचे सहकार्य घेउन आरोग्य सेवेला सुदृढ करण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. मनपाने आपले दवाखाने, इमारती सामाजिक संस्थांना आरोग्य सुविधा देण्याकरीता उपलब्ध करुन दिल्यास मोठ्या प्रमाणात संस्था औषधी आणि डॉक्टर नियुक्त करायला तयार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच त्यांनी दहा चालते- फिरते दवाखाने सुरु करणे आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांकरीता वाहनांची विशेष व्यवस्था (dedicated) करण्याचेही निर्देश दिले.

  स्थायी समिती सभापती श्री. विजय झलके यांनी नेहरुनगर झोनच्या राजाबाळ चिटणीस शाळेत आरोग्य विषयक संशोधन केंद्र सुरु करण्याची सूचना केली. ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल यांनी सुध्दा आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याबद्दल मार्गदर्शन केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145