| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jan 10th, 2021

  देश आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या प्रचंड क्षमता : ना. गडकरी

  ‘वॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम’चा कार्यक्रम


  नागपूर: सध्याच्या काळात देशातील प्रत्येक क्षेत्राला लागणारे तंत्रज्ञान, कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ, संशोधन, कच्चा माल उपलब्ध असल्यामुळे देश आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रचंड क्षमता आहेत. यामुळे देश आत्मनिर्भर होणार असल्याचा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

  ‘वॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रासह मागास जिल्ह्यांच्या विकासाकडे प्राधान्य देण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद या चार महत्त्चाच्या गोष्टींची उद्योगांना गरज असते. या चारही बाबी देशाकडे उपलब्ध आहेत. म्हणून उद्योगांचा विकास निश्चितपणे होईल पण तो कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात उद्योगांचा विकास होणे आवश्यक आहे. कच्च्या मालावर आधारित उद्योग सुरु व्हावेत, असेही ते म्हणाले.

  उद्योगांचा विकास झाल्याशिवाय रोजागार निर्मिती होणार नाही आणि रोजगार निर्मिती झाल्याशिवाय गरिबी निर्मूलन होणार नाही, असे सूत्र सांगताना ना. गडकरी म्हणाले- निर्यातीत वाढ आणि तंत्रज्ञानाचा विकासही महत्त्वाचा आहे. उद्योगांसाठी खेळते भांडवल ही एक समस्या आहे. पण शासनाने 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यत दिली असल्यामुळे व देशातील सर्वच क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणुकीस अधिक वाव आहे. भारतात गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळणार हे खात्रीने सांगता येते.

  देशात आज प्रत्येक क्षेत्रात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होण्याची स्थिती असल्याचे सांगताना ते म्हणाले- जलवाहतूक, रस्ते वाहतूक, विमान वाहतूक, ऑटोमोबाईल क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, रेल्वे, इंधन निर्मिती क्षेत्र, कृषी क्षेत्र अशा सर्वच क्षेत्राची प्रगती होताना दिसते. या पध्दतीने एकत्रित विकासाची गरज देशाला आहे. तंत्रज्ञानातही बदल होत आहे. विकसित तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनवीन संशोधन व त्यापासून उत्पादन निर्मिती होते. कोविडनंतरच्या काळात विकासात अधिक प्रगती होत असल्याचे दिसून येते असेही ना. गडकरी म्हणाले.

  केंद्र शासन सर्वच क्षेत्रासाठी अत्यंत चांगल्या आणि सकारात्मक दृष्टीने निर्णय घेऊन काम करीत आहे. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, जलद निर्णय आणि नावीण्य, संशोधन, विज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान यावर शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले. आगामी काळ उद्योग आणि व्यापारासाठी ‘रेड कार्पेट’चा काळ असेल असेही ते म्हणाले.

  3 Attachments

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145