| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 21st, 2020

  प्रामाणिक सुरक्षा रक्षकाचा उपमहापौरांनी केला सत्कार

  २३ लाखांची बॅग परत करून दिला प्रामाणिकपणाचा संदेश

  नागपूर : सीताबर्डीमधील गजबजलेल्या मुंजे चौक परिसरात बेवारस अवस्थेत सापडलेली २३ लाख रुपयांनी भरलेली बॅग प्रामाणिकपणे परत करणा-या सुरक्षा रक्षकाचा उपमहापौर मनीषा कोठे यांनी सोमवारी (ता.२१) महानगरपालिकेतर्फे सत्कार केला. युवराज सदाशिव चामट असे प्रामाणिक सुरक्षा रक्षकाचे नाव असून ते खरबी रोडवरील शक्तीमाता नगर येथील रहिवासी आहेत. मनपा मुख्यालयातील उपमहापौर कक्षामध्ये उपमहापौर मनीषा कोठे यांनी मनपाचा मानाचा दुपट्टा, तुळशीरोप देउन युवराज चामट यांचा सन्मान केला. यावेळी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

  मागील आठवड्यामध्ये सायंकाळच्या सुमारास मुंजे चौकामध्ये ब-याच वेळेपासून एक बॅग बेवारस अवस्थेमध्ये पडून होती. कुणीही बॅग उलचल्यास धजावत नसताना एटीएममध्ये रोकड जमा करणारे सीएमएस कंपनीचे युवराज सदाशिव चामट, शुभम संजय हरडे, सनी विजय येवले आणि अतुल गणेशराव चतुरकर हे चार सुरक्षा रक्षक तिथे पोहोचले व त्यांनी बॅग उघडून पाहिली. बॅगमध्ये पूर्ण नोटा भरलेल्या आढळताच कुठलाही विचार न करता त्यांनी थेट सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिस स्टेशनमध्ये बॅग जमा करून चारही सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्रामाणिकपणाची प्रचिती दिली. सुरक्षा रक्षकांच्या या धाडसी आणि प्रामाणिकपणाबद्दल पोलिस प्रशासनाकडूनही त्यांचे कौतुक करण्यात आले. पोलिस उपायुक्त (झोन २) विनीता शाहू यांनी चारही सुरक्षा रक्षकांचा सत्कार केला. शिवाय सीएमएस कंपनीद्वारेही सर्वांना गौरविण्यात आले. अन्य सर्व मान्यवरांनी युवराज चामट यांचे कौतुक करून त्यांचे या उत्कृष्ठ कार्यासाठी अभिनंदन केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145