नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन
नागपूर : ‘तुम मुझे खुन दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ असा नारा देत आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला हादरा देणारे थोर स्वातंत्र्य संग्राम सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सतरंजीपुरा आणि मानस चौक स्थिती नेताजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नागपूर नगरीच्या वतीने अभिवादन केले.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस हे कलकत्ता नगरीचे महापौर होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिकेच्या शाळांत नोकरी देऊन विधवा स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला. या आणि अशा अनेक प्रसंगांची आठवण करुन देत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. इतर मान्यवरांनीही यावेळी नेताजींच्या शौर्यगाथा कथन केल्या. यावेळी नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक नितीन साठवणे, मनोज चापले, माजी नगरसेवक नेताजी साकोरे, नारायणराव नाईक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत सर्जेराव गलपट व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह माजी उपमहापौर तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख शेखर सावरबांधे, नगरसेविका मंगला गवरे उपस्थित होते.
सर्वांनी नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी एनएसएससीडीसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, शिवसेनेचे सतीश हरडे, बंडुजी तागडे, नीलम उमाठे आदी उपस्थित होते.