| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 16th, 2020

  कोव्हिड-१९ लसीकरणासाठी सज्ज राहा : आयुक्त राधाकृष्णन बी.

  – नागरी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आवाहन : तयारीचा घेतला आढावा

  नागपूर– कोव्हिड-१९ च्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. त्यासाठी शहरातील संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

  मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात नागरी टास्क फोर्स सांतिच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता. १५) करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रिकोटकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सर्विलेन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन यांच्यासह टास्क फोर्स समितीचे सदस्य उपस्थित होते.

  बैठकीत पुढे बोलताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, कोव्हिडच्या काळात आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे लसीकरणाचा आहे. ही जबाबदारीही त्यांनाच पार पाडायची आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्हीचा डाटा बेस तातडीने तयार करावा. झोननिहाय खासगी रुग्णालयांकडूनही तातडीने माहिती मागवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. लसीकरणासाठी शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती, त्याची चाचपणी, आवश्यक असलेल्या सोयी, आवश्यक असलेली कोल्ड चेन याबाबतचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

  यावेळी सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान यांनी कोव्हिड लसीकरणासंदर्भातील तयारी कशी असावी याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. लसीकरण केंद्र कसे असावे, तेथे काय काय सोयी असाव्यात, तेथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यायची, लसीकरण मोहिमेत कुठल्या विभागाची काय भूमिका राहील, आदींबाबत माहिती दिली. व्हिडिओच्या माध्यमातून विस्तत मार्गदर्शन केले. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल. पहिले प्रशिक्षण १९ डिसेंबर रोजी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनीही मनपाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. लाभार्थ्याची माहिती जमा करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘कोव्हीन’ अँप बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

  १७ जानेवारीला पल्स पोलिओ मोहीम
  भारत देश पोलिओमुक्त झाला आहे. यापुढेही देशात पोलिओचा शिरकाव होऊ नये यासाठी दरवर्षी पोलिओ अभियान राबविण्यात येते. १७ जानेवारी २०२१ रोजी पोलिओ अभियान राबविण्यात येणार असून त्या दिवशी ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सर्व्हिलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान यांनी यावेळी दिली. यासाठी टास्क फोर्सची भूमिका महत्त्वाची असते. पोलिओ अभियानादरम्यान शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १०० टक्के बालकांना पोलिओ डोज देण्यात येईल, यादृष्टीने तयारी आणि जनजागृती करावी, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145