| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 30th, 2020

  ग्रा.पं. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

  – सायंकाळी साडे पाच पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत

  नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये 130 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.यासाठी उद्या बुधवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.

  राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी आज जारी केलेल्या पत्रकानुसार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या बुधवार दिनांक 30 डिसेंबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारांना ऑफलाइन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. वेळापत्रकानुसार वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे निर्देशित केले आहे. तसेच जात पडताळणी समितीकडे ऑफलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र करिता अर्ज दाखल करता येणार आहेत.

  नागपूर जिल्ह्यात 130 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. यासंदर्भात 11 डिसेंबर 2020 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. 13 तालुक्यांमध्ये तहसीलदारांमार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार आता निवडणूक अंतिम टप्प्यात असून उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

  प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर रोजी सकाळी अकरानंतर तालुका स्तरावर करण्यात येईल. उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी तीन पर्यंत मागे घेता येईल. 4 जानेवारी रोजी दुपारी 3 नंतर अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून चिन्ह वाटपाची कार्यवाही तालुकास्तरावर करण्यात येईल.निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक असल्यास 505 मतदान केंद्रावर दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेतल्या जाईल. मतदानानंतर मतमोजणी 18 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पासून तालुकास्तरावर होईल. याच ठिकाणी मतदानाचा निकाल जाहीर केल्या जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक डॉ. शिवनंदा लंगडापुरे नागपूर यांनी दिली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145