व्रतस्थ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व : नितीन गडकरी
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे आज दुपारी निधन झाले. यानिमित्त राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना विनम्र श्रध्दांजली अर्पण केली.
पूज्य श्री गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे व त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझा लहानपणापासून बाबुरावजींशी व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे.
मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले आहेत. खरे तर बाबुराव शतायुषी होतील, हा ठाम विश्वास मला होता.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, याची अतीव दु:ख आहे, अशी भावना व्यक्त करीत ना. नितीन गडकरी यांनी ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, अशी सद्भावनही व्यक्त केली