| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Dec 19th, 2020

  शहरात उत्कृष्ट प्रकल्प राबवला,लॉयन्स क्लबने मेट्रोची पाठ थोपटली

  – लॉयन्स क्लब तर्फे महा मेट्रोला व्हील चेयर भेट

  नागपूर– महा मेट्रोच्या विविध उपक्रमांना समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, आज लॉयन्स क्लब ऑफ नागपूर सिटी तर्फे महा मेट्रोला दोन व्हील चेयर भेट देण्यात आल्या. महा मेट्रोच्या एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात या खुर्च्या भेट देण्यात आल्या. महा मेट्रो आणि लॉयन्स क्लब ऑफ नागपूर सिटीचे वरिष्ठ पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  जागतिक पातळीवर तसेच शहराच्या विविध क्षेत्रात समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात एक अग्रगण्य संस्था असे नाव लौकिक असलेल्या लॉयन्स क्लब च्या पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी महा मेट्रो तर्फे शहरात राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पा बद्दल गौरवोद्गार काढले. लॉयन्स क्लब ऑफ नागपूर सिटीचे रिजनल चेअरपर्सन श्री निशिकांत प्रतापे यांनी आपल्या भाषणात अतिशय कमी वेळात नागपुरात एक उत्कृष्ट प्रकल्प राबवल्या बद्दल महा मेट्रोला धन्यवाद दिले.
  या प्रसंगी बोलताना लॉयन्स क्लबचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री रमेश शाह यांनी इतवारी, गांधीबाग आणि त्या भागातील अन्य बाजारपेठांशी संबंधित असलेल्या व्यापाऱ्यांकरिता सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर दरम्यान प्रवासी सेवा अतिशय उपयुक्त ठरणार असून ती लौकर सुरु होईल हि अपेक्षा व्यक्त केली. इतवारी बाजारपेठ त्या परिसरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग व्यवसाय करत असून हे व्यापारी या भागातील प्रवासी सेवा सुरु होण्याची वाट बघत असल्याचे श्री शाह म्हणाले.

  शहरातील या महत्वाच्या प्रवासी सेवेचा फायदा सर्व सामान्यांना अधिक मिळावा या करता लॉयन्स क्लब ऑफ नागपूर सिटी महा मेट्रोला मदत करण्याकरता सदैव तयार असल्याचे आश्वासन क्लबचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर कारकर तसेच डिस्ट्रिक्ट बँकर श्री. राजेश जोशी यांनी दिले. आजच्या या कार्यक्रमाला लॉयन्स क्लब तर्फे श्री रमेश ठाकूर, श्री. अंजनी कुमार मिश्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी, तसेच महा मेट्रोचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन) श्री सुधाकर उराडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. श्री. उराडे यांचा सत्कार लॉयन्स क्लबच्या अधिकाऱ्यांनी केला.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145