| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 19th, 2021

  भोईपुरातील मच्छी मार्केटचे अतिक्रमण हटविले

  मनपाच्या कारवाईने नागरिकांना दिलासा : दहाही झोनमध्ये धडक कारवाई सुरूच

  नागपूर : नागपूर शहरातील रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानंतर शहरामध्ये अतिक्रमण निर्मूलन कारवाईने चांगलीच गती पकडली आहे. मंगळवारी (ता.१९) शहरातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित व नागरिकांसाठी समस्या ठरत असलेले गांधीबाग झोन अंतर्गत इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) समोरील भोईपुरा भागातील मच्छी मार्केटचे अतिक्रमण सुद्धा काढण्यात आले. मनपाच्या या कारवाईने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी मनपाकडे प्राप्त झालेल्या होत्या.

  शहरातील वाढते अतिक्रमण व त्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांना भेडसावणा-या समस्यांवर दिलासा मिळावा याकरिता संपूर्ण शहरात एकाचवेळी अतिक्रमण विरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानंतर सोमवारपासून संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली.

  मंगळवारी भोईपुरा भागातील मच्छी मार्केटसह धरमपेठ झोन अंतर्गत गोकुलपेठ बाजार परिसरामधील अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात काढण्यात आले. याशिवाय तुकडोजी चौक ते क्रीडा चौक मार्गावर असलेले अतिक्रमणही पथकाने हटविले. धंतोली झोन अंतर्गत मोक्षधाम घाट रोड व ट्रिलिएम मॉल रोडवरील सुद्धा अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. उपायुक्त (अतिक्रमण) श्री. महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व झोनच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात प्रत्येक झोनमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम चालविण्यात येत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145