| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 9th, 2021

  कर्मचाऱ्यांना चालू महिन्यापासून मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ

  – महापौरांच्या पत्रावर आयुक्तांची सकारात्मक भूमिका : २० जानेवारीपर्यंत वेतननिश्चिती करण्याचे निर्देश

  नागपूर : नव्या वर्षात नव्या महापौरांच्या शिष्टाईने मनपा कर्मचारी आणि शिक्षकांना गोड बातमी मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज (ता. ८) मनपा आयुक्तांना पत्र दिले. त्याची तातडीने दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात देय असलेल्या जानेवारीच्या वेतनापासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

  यासंदर्भात शुक्रवारी प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांनी सर्व विभाग प्रमुखांसाठी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अख्यत्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकांची जानेवारी २०२१ ची वेतन देयके विकल्प फॉर्म, वेतन निश्चिती फॉर्म आणि वचनपत्रासह वित्त विभागाला २० जानेवारी पर्यंत पारीत करण्याकरिता सादर करावयाची आहे. माहे जानेवारी-२०२१ मध्ये वेतन देय झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत वित्त विभागातील वेतन पडताळणी पथकाकडून वेतन निश्चिती विभाग प्रमुख तपासून घेतील. वेतन निश्चितीत अतिप्रदान आढळल्यास त्याची एकमुस्त वसुली ही नंतरच्या देय होणाऱ्या महिन्याच्या पगारातून करण्यात येणार आहे. याबाबतचे हमीपत्र कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे.

  विशेष म्हणजे जानेवारी २०२१ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन प्रदान करताना सातव्या वेतन आयोगाची १ जानेवारी २०१६ ते ३० ऑगस्ट २०१९ पर्यंतच्या कालावधीची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही, असे परिपत्रकात नमूद आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन १ सप्टेंबर २०१९ पासून देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंतर्गत समकक्ष वेतनश्रेणीनुसार १ जानेवारी २०१६ पासून काल्पनिक वेतनवाढी देऊन वेतन निश्चिती देण्यात यावी, असे परिपत्रकात नमूद आहे. सर्व नियमित कर्मचाऱ्यांकडून विकल्प फॉर्म, वेतन निश्चिती फॉर्म तसेच वचनपत्र भरुन विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीसह सेवापुस्तकामध्ये रीतसर नोंद घेऊन भरून घेण्यात यावे, असे निर्देशित केले आहे.

  महापौरांनी केलेल्या शिष्टाईनंतर मनपा प्रशासनाने निर्णय घेतल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी महापौरांचे आभार मानले आहे आणि प्रशासनालाही धन्यवाद दिले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145