पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न
नागपूर : नागपूर महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी (ता. २२) पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली.
यावेळी समिती सदस्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा ढवळे, सदस्य स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय मराठे, वीणा खानोरकर, डॉ. किर्तीदा अजमेरा, रेडिओलॉजीसट डॉ. प्रशांत ओंकार, जेनेटीसीस्ट डॉ. विनय टुले, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस उपस्थित होते.
बैठकीमध्ये नवीन सोनोग्रॉफी केंद्रांना मान्यता देणे तसेच सोनोग्रॉफी केंद्राच्या नुतनीकरण मान्यतेबाबत चर्चा करण्यात आली. नवीन सोनोग्रॉफी केंद्रांना मान्यता देण्याबाबत सहा प्रकरणे समितीपुढे सादर करण्यात आली. यापैकी पाच केंद्रांना मान्यता देण्यात आली. उर्वरित एका प्रकरणाबाबत संबंधित डॉक्टर शासकीय सेवेत आहेत त्यामुळे त्यांना ‘नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स’ (एनपीए) सुद्धा मिळत असतो. त्यांनी ‘एनपीए’ मिळत नसल्याचे कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांची परवानगी स्थगित ठेवण्यात आली आहे.
पाच नवीन सोनोग्रॉफी केंद्रांसह सहा सोनोग्रॉफी केंद्रांच्या नुतनीकरणाला बैठकीत मान्यता देण्यात आली. गर्भलिंग निदान चाचणीस प्रतिबंध करण्यासाठी एखाद्या ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यास त्या ठिकाणी तपासणीसाठी बनावट रुग्ण किंवा गरोदर माता पाठवून अधून मधून स्टींग ऑपरेशन (डिकॉय केसेस) करण्यात यावे, असेही बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.
सध्या नागपूर शहरामध्ये स्त्री – पुरूष लिंग गुणोत्तर डिसेंबर २०२० पर्यंत १००० ला ९३३ याप्रमाणे आहे.