जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयात दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान
नागपूर: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक कार्यालयात प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी यांच्या हस्ते दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाची आवर्जून दखल घेण्यात आली तसेच या कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणींजाणून त्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक कार्यालयात कार्यरत अधीक्षक अभियंता हरीष गजबे तसेच मानव संसाधन विभागामध्ये कार्यरत निम्नस्तर लिपिक नितीन तलखंडे यांचा पुष्पगुच्छ तसेच दिव्यांग हक्क अधिकार अधिनियम-२०१६ च्या प्रती प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.दिव्यांग कर्मचारी आपल्या दिव्यंगत्वाची तमा न बाळगता आपले कर्तव्य उत्कृष्टरित्या निभावत असतात. अशा परिस्थितीत इतर कर्मचाऱ्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना कायम सहकार्य करावे आणि त्यांना समानतेची वागणूक द्यावी, असे आवाहन प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी यावेळी केले.
याप्रसंगी महाव्यवस्थापक (वि व ले ) शरद दाहेदार ,सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपविधी अधिकारी डॉ. संदीप केने आदी मान्यवर उपस्थित होते.