Published On : Tue, May 17th, 2022

सावधान, अति खाजगी संभाषण रेकॉर्ड होतेय : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

संयम गमावून अनेकजण ठरताहेत बळी, सोशल मिडियाच्या गैरवापरातून नको तो मनस्ताप.

नागपूर: डिजिटल व्यवहार अन् इंटररनेटने क्रांती केल्यानंतर सोशल मिडियाच्या गैरवापरातून खळबळजनक घटना पुढे येत असून गुन्हेगारी विश्वात नव्या गुन्ह्याची नोंद होत आहे. अनेकजण फारशी माहिती न घेता महिलांशी संभाषण करताना संयम गमावून ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकाराला बळी पडत आहे. समोरच्या महिलेशी चॅटींग, एक पाऊल पुढे जात व्हिडिओ कॉलिंगचे बेमालूमपणे रेकॉर्डिंग केले जात असून संबंधितांकडून प्रतिष्ठित व्यक्तिंनाही ‘टारगेट’ केले जात आहे.

सद्यस्थितीत सोशल मिडियाचा गैरवापराचे अनेक प्रकार दिसून येत असून सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. इंटरनेट व सोशल मिडिया क्रांतीमुळे सायबर गुन्ह्यातही मोठ्या संख्येने वाढ होत असून अनेक प्रकरणे हाताबाहेर जात असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी नमुद केले. चार दिवसांपूर्वी मुंबईत मुख्याध्यापकच सेक्सटॉर्शनचे बळी पडल्याची घटना पोलिस नोंदीतून उघडकीस आली. सोशल मिडियाच्या माध्यमातून एका महिलेने मुख्याध्यापकांशी मैत्री वाढवली. एक दिवस मुख्याध्यापकाला महिलेने व्हीडीओ कॉल करण्यास सांगितले. व्हीडीओ कॉल केला असता ती महिला विवस्त्र होऊन पुढे आली. तिने मुख्याध्यापकालाही विवस्त्र होण्यास सांगितले. हे सारे तिने रेकॉर्डिंग केले. नंतर एक दिवस इमेलद्वारे मुख्याध्यापकाकडे खंडणीची मागणी केली. अखेर भयभीत झालेल्या मुख्याध्यापकाने पोलिस स्टेशन गाठून सारा प्रकार पोलिसांना सांगितला.

ही घटना मुंबईत घडली असून मुख्याध्यापकांने दाखविलेल्या हिमतीमुळे हा प्रकार उघडकीस आला. परंतु अनेकजण अशा ब्लॅकमेलिंगला (सेक्सटॉर्शन) बळी पडत असून अनेक कटकटींचा त्यांना सामना करावा लागत आहे. अनेकजण या घटना बाहेर उघडकीस येऊ नये म्हणून महिला किंवा संबंधित गॅंगला हवे ते देत आहे. यातून अनेकदा पैशाशिवाय इतरही मागणी केली जात असल्याने कुटुंबच उध्वस्त होण्याची भीती पारसे यांनी व्यक्त केली. सोशल मिडियाच्या गैरवापराचा हा एकच नव्हे तर अनेक प्रकार आहेत. विविध पोर्टल्सवर व्यक्त होणाऱ्या यूजर्सच्या पोस्टचा नियमित अभ्यास करून सावज हेरले जाते.

या सावजाकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून काही टक्केवारी देऊन बेरोजगारांना काम दिले जात आहे. त्यामुळे बेरोजगार तरुण पिढीचे भवितव्यही चुकीचे दिशेने जात आहे. सामान्य माणसांच्या तुलनेत गुन्हेगारच सोशल मिडियाचा शंभर टक्के वापर करीत असून फसव्या लिंक्स, फेक कॉलचे जाळे आणखी घट्ट होत आहे. अनेकदा समाजविघातक लेख, प्रचाराचे साहित्यही सोशल मिडियावर दिसून येत आहे. परंतु अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सोशल मिडियाचा वापर करताना अनेकांची ‘चलता है’ दृष्टीकोन धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

सोशल मिडियावर मैत्री करताना पुढील व्यक्तिपुढे संयमाने वागणे गरजेचे आहे. अनेकदा महिला किंवा पुरुष शॉर्ट टर्म पेशन्समुळे नको त्या नादाला लागतात. पुढील व्यक्ती कदाचित तुमच्याकडे सावज म्हणून पाहात असेल. पुढील व्यक्ती असामाजिक, अश्लिल व्हिडिओ पाठवत असेल, अपलोड करीत असेल तर तत्काळ सोशल मिडियावरील ब्लॉक ॲन्ड रिपोर्टचा पर्याय वापरावा.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.

www.webnagpur.com