| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 15th, 2020

  अभय योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्या

  महापौर संदीप जोशी, कार्यकारी महापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आवाहन

  नागपूर : थकीत मालकत्ता कर संदर्भात नागपूर महानगरपालिकेतर्फे १५ डिसेंबर पासून लागू करण्यात आलेल्या ‘अभय योजने-२०२०’ चा जास्तीत जास्त नागपूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी महापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती श्री.विजय (पिंटू) झलके आणि मनपा आयुक्त श्री.राधाकृष्णन बी. यांनी यांनी संयुक्तपणे केले. महापौर श्री.संदीप जोशी यांनी सुध्दा नागरिकांना या सवलतीचा लाभ मोठया प्रमाणात घेण्याचे आवाहन केले आहे.

  मनपाद्वारे लागू करण्यात आलेल्या ‘अभय योजना-२०२०’ संदर्भात सविस्तर माहिती देण्याबाबत मंगळवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन येथील आयुक्त सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराचे महापौर संदीप जोशी व्हिडिओ कॉन्फर्निंगच्या माध्यमातून जुळले होते. पत्रकार परिषदेत कार्यकारी महापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कर समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर उपस्थित होते.

  कोरोनाच्या या संकटामध्ये सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत नागपूर महानगरपालिकेची आर्थिक घडीही विस्कटली आहे. मनपाचे उत्पन्न पूर्वपदापर्यंत आणणे आणि नागरिकांनाही या संकटाच्या काळात दिलासा मिळावा, या उद्देशाने ‘अभय योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा नागपूरकर जनतेला मोठा फायदा होणार आहे. कर भरणासाठी यापूर्वीही मनपातर्फे अनेक उपयुक्त योजना आणण्यात आल्या. मात्र या योजनांचा कालावधी कमी होता. अभय योजनेचा कालावधी दोन महिने असल्यामुळे नागरिकांनाही कर भरण्यासाठी वेळ मिळणार आहे, त्यामुळे थकीत कर असणा-या नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी केले.

  योजनेबद्दल विस्तृत माहिती देताना स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी सांगितले, मागील अनेक वर्षांपासून कर न भरणा-या थकीत कर धारकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे लागू करण्यात आलेल्या अभय योजनेमुळे मालमत्ता कर धारकांना ८० आणि ५० टक्के शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. ‘अभय योजने’चा कालावधी १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ असा राहील. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत कर असणाऱ्या तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत न भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणा-या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. दोन महिन्याचा मोठा कालावधी या योजनेसाठी देण्यात आला आहे. पहिल्या महिन्यात म्हणजे १५ डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये थकीत कर भरणा-यांना ८० टक्के शास्ती माफीचा लाभ घेता येईल. तर १५ जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये कर भरणा-यांचे ५० टक्के शास्ती माफ होईल, अशीही माहिती स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली.

  सुलभ ऑनलाईन प्रक्रिया
  योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देताना आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, ‘अभय योजना’ संपूर्ण नागपूर शहरामध्ये यशस्वीरित्या लागू करण्याबाबत मनपा प्रशासन सज्ज आहे. शहरातील प्रत्येक झोन कार्यालयामध्ये प्रत्येकी दोन कर भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अगदी सहजपणे नागरिकांना कर भरता येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून काही मिनिटातच आपल्याला कर भरणा करता येणार आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे बँक शुल्क आकारण्यात येत नाही. याशिवाय नियमित कर भरणा करणा-यांना त्यांच्या करामध्ये ४ टक्के सवलत देण्याची योजना सुरूच राहणार आहे, असेही आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले.

  जनजागृतीवर भर द्या : महापौर संदीप जोशी
  मनपाद्वारे सुरू करण्यात आलेली ‘अभय योजना’ ही नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आणि उपयुक्त योजना आहे. कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासनाद्वारे योजना लागू करण्याचा निर्णय स्तूत्य आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा यासाठी यासंदर्भात योग्य जनजागृती होणे आवश्यक आहे. मनपाच्या कचरा संकलन करणा-या गाड्या, होर्डींग, बॅनर, पत्रके यांच्या माध्यमातून शहरातील सर्वच भागात या योजनेची जनजागृती केली जावी. याशिवाय झोनस्तरावर प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनाही यामध्ये सहभागी करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फर्निंगच्या माध्यमातून केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145