| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jan 24th, 2021

  बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान !

  – विदर्भातील पर्यटनाला नवे परिमाण

  आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र उद्योग म्हणून जगात सर्वत्र विकसित झाला आहे. सिमेंट-काँक्रीटच्या जंगलामध्ये राहणारा माणूस आंतरिक उर्मीने निसर्गनिर्मित सौंदर्याकडे वळू लागला आहे. विज्ञानामुळे आज सारी भौतिक सुखे माणसाजवळ असली तरी मानसिक शांतता केवळ निसर्गाच्या कुशीतच मिळते. अशावेळी देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहरालगत उमरेड कऱ्हांडला, पेंच आदी अभयारण्यानंतर ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. या प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे नागपूर येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारित असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व इतर अनुषांगिक सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही वेगाने सुरु आहे. उदघाटनानंतर भारतीय सफारी नागरिकांसाठी खुली केली जाणार असून 40 आसन क्षमतेची तीन विशेष वाहने व ऑनलाईन तिकीट बुकींग सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

  राज्यात पर्यटनवाढीला चालना मिळावी, पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी राज्य शासन सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. विदर्भाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरलेल्या ­­­’ताडोबा व्याघ्र प्रकल्पा’प्रमाणेच ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ विदर्भाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख निर्माण करून देणार आहे. 1914 हेक्टर वनक्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारले आहे. देशातील अशाप्रकारचे हे सर्वात मोठे प्राणी उद्यान राहणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागाराच्या मदतीने त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून विदर्भाच्या पर्यटनाला एक नवे परिमाण या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभणार आहे.

  नागपूर जिल्ह्यातील मौजे गोरेवाडा येथे वन जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 12 डिसेंबर 2005 ला मान्यता दिली होती. प्राणी उद्यान व वन्यप्राणी बचाव केंद्राची स्थापना फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (एफडीसीएम) मार्फत तर गोरेवाडा प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक खाजगी भागीदारी या तत्त्वावर करण्यासाठी एफडीसीएम लि. व खाजगी निवेशक यांची विशेष उद्देश व्यवस्था तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या प्रकल्पात सुरुवातील शासनाची भागीदार 51 टक्के तर खाजगी निवेशकाची भागीदार 49 टक्के राहील. यादरम्यान वनक्षेत्राचे व वन्यजीवांचे संरक्षण तसेच अधिवास विकास काम ‘एफडीसीएम’ मार्फत करण्यात येत आहे. यासाठी वनविभागकडून अनुदान व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहराच्या मध्यापासून ‘गोरेवाडा’ हे ठिकाण फक्त सहा किलोमीटरवर असून भविष्यात हे एक मोठे व महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

  या प्राणी उद्यानात इंडियन सफारींतर्गत एंट्रन्स प्लाझा, वाघ सफारी, अस्वल सफारी, बिबट सफारी, तृणभक्षी प्राणी सफारीचे काम पूर्ण झाले आहे. या सफारीसाठी वन्यप्राणी या उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. हा प्रकल्प शहरालगत असल्याने या भागात निसर्ग पर्यटनाला तर चालना मिळणार आहे. याशिवाय रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, पुनर्वसनासह संशोधन व शिक्षण याबाबतही येथे लवकरच सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत येथे जंगल सफारी (ड्राईव्ह) सुरु आहे.

  या प्रकल्पात उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधांचे काम़ जलदगतीने सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील पर्यटन सुविधांचे काम पूर्ण झाले असून लवकरच दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सुविधा पूर्ण करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात आफ्रिकन सफारीसाठी काम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. आगामी काळात येथे पक्ष्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. या जागेवर ‘बर्ड पार्क’ विकसित करण्याचे नियोजन आहे.

  जलाशयाचे बांधकाम
  गोरेवाडा प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणी उद्यानासाठी आवश्यक पाण्याची सोय करण्यासाठी जलसंपदा विभाग, नागपूरकडून ई-निविदा काढण्यात आल्यात व कंत्राटदाराची निवड करुन एकूण 19.01 क्षेत्रात जलाशयाचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली. सद्य:स्थितीत जलाशयाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या पावसाळ्यात पाणीसाठा पूर्ण होईल.

  वन्यप्राणी दत्तक योजना
  वन्यप्राणी संगोपनासाठी बचाव केंद्रामध्ये वन्यप्राणी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. वन्यप्रेमी या योजनेत आपल्या आवडीनुसार प्राणी दत्तक घेवून त्यांचा खर्च करण्यासाठी ठरवून दिलेला दर प्राणी उद्यानाला देतात. सद्य:स्थितीत वन्यप्राणी दत्तक योजनेनुसार बचाव केंद्रात 24 बिबट, 9 वाघ, 4 चितळ, 10 अस्वल, 18 माकडे, 23 निलगाय आणि 2 रिव्ह पिजंट ठेवण्यात आले आहेत.

  गोरेवाडा प्राणी उद्यान बचाव केंद्र
  गोरेवाडा प्राणी उद्यानातील वन्यप्राणी बचाव केंद्रात वन्यप्राण्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आधुनिक वैद्यकीय व्यवस्था, संसर्गजन्य रोगांची लागण टाळण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे तसेच निवडक वन्यप्राण्यांचे प्रजनन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

  गोरेवाडा तलाव
  गोरेवाडा तलावाच्या चहूबाजूला सौंदर्यीकरण करण्यात आले असून, पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व विषद करणारे फलक विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. वने व वन्यजीव संरक्षणासाठी पाच संरक्षण मनोरेही बांधण्यात आले आहे. वनक्षेत्रांतर्गत अधिवास विकसित करण्यासाठी येथील सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रातील घाणेरी (लांटेना कॅमेरा) वनस्पतीचे निर्मूलन करण्यात आले आहे. तसेच जलाशयाच्या सभोवताली असलेल्या बेशरम प्रजातीच्या एकूण दहा हेक्टर क्षेत्रातून समूळ उच्चाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पक्षेत्रात पर्यटकांसाठी निसर्ग पायवाट तयार करण्यात आली आहे. जगाच्या कोलाहलापासून दूर नेणारी येथील निसर्ग पायवाट पर्यटकांना आकर्षित करते.

  गोरेवाडा प्राणी उद्यान शहरालगत असल्यामुळे येथील वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी नागपूर-काटोल राज्य महामार्गाच्या दुतर्फा 21 किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे.

  जंगल सफारीचे शुल्क

  गोरेवाडा जंगल सफारी पर्यटकांसाठी डिसेंबर 2015 पासून सुरु करण्यात आली आहे. बुकींगसाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध आहे. सकाळी 7.30 ते 11.30 व दुपारी 3.30 ते 6.30 अशी सफारीची वेळ आहे. जंगलामध्ये फिरण्यासाठी शनिवार, रविवार वगळता आठवडयातील पाच दिवसांसाठी एसी बसला 300 रुपये तर शनिवार, रविवारी 400 रुपये आकारणी आहे. फक्त तृणभक्षी प्राण्यांच्या सफारीसाठी केवळ 100 रुपये प्रवेश शुल्क आहे. जंगल सफारी आणि निसर्ग पायवाटेसह पर्यटक येथे सायकल सफारीचाही मनमुराद आनंद लुटतात.

  प्राणी उद्यानात पर्यटकांसाठी पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहे. अशा या वैविध्यपूर्ण आणि निसर्गाने नटलेल्या आंतररष्ट्रीय प्राणी उद्यानातील सफारीला नागरिकांची निश्चितच पसंती मिळेल.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145