विभागीय माहिती संचालनालयात अरुणा सबाने, पेठकर यांचा सत्कार
नागपूर: अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने आणि प्रसिध्द साहित्यिक श्याम पेठकर यांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील विभागीय माहिती कार्यालयात ह्दय सत्कार करण्यात आला. दोन्ही पुरस्काराथींनी यावेळी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मुक्त संवाद साधला.
नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील कार्यालयात हा अनोखा उपक्रम पार पडला. महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागूल यांच्या हस्ते श्रीमती अरुणा सबाने व श्री. पेठकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, सहाय्यक संचालक शैलजा वाघ आदींसह कर्मचारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना पुरस्कार विजेत्यांनी आपली आजवरची वाटचाल विषद केली.
प्रश्न पडले पाहिजे -पेठकर
आयुष्यात मला काही प्रश्न पडत गेले. त्याची उत्तरे शोधताना मला जगणं सापडत गेलं. जगणं लिहिताना माणसं वाचत गेलो. समाजात आपल्या आजुबाजूला असणारी माणसं वाचता आली पाहिजेत. त्यांच्या भावनांशी एकरुप होता आलं पाहिजे. भावना-अश्रू डाऊनलोड करता येत नाही. त्यासाठी माणसामध्ये राहावं लागतं. जाणिवांशी नातं जोडावं लागतं. आजवर हीच भावना घेऊन सामाजिक क्षेत्रासह पत्रकारितेच्या माध्यमातून वाटचाल केल्याचे श्री. पेठकर यावेळी म्हणाले. या वाटचालीत आलेले विविध अनुभवाचे कथनही त्यांनी केले.
पुरस्काराने जबाबदारी वाढली
वयाच्या सतराव्या वर्षापासून विविध चळवळीत काम करण्यास सुरूवात केली. सामाजिक जाणिवेने कार्यकर्तेपण निभावलं. त्यासोबतच विविध सामाजिक प्रश्नांबाबतही सातत्याने लिहित राहिले. अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाने हा लेखन प्रवास समृध्द होत गेला. लिहितानांच समाजातील विविध वंचित घटकांशी जोडले गेले. गेल्या 20 वर्षांत माहेर संस्थेच्या माध्यमातून 4 हजाराहून अधिक स्त्रियांविषयक प्रकरणे हाताळली. समाजातूनही चांगला सहयोग लाभला. महाराष्ट्र फाऊंडेशच्या कार्यकर्ता पुरस्काराने जबाबदारी वाढली असल्याची नम्र भावना श्रीमती सबाने यांनी व्यक्त केली.
नियमित शासकीय कर्तव्य बजावतांनाच अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामाजिक-सांस्कृतिक गुणवत्ता वाढावी. त्यांच्या जाणिवा विकसित होण्यासह समाजातील वास्तवाची जाण वाढावी. त्यातून शासकीय कामकाज अधिकाअधिक लोकाभिमुख व्हावे. याउद्देशाने जाणिवांचा संस्कार रुजवण्यासाठी या दोन्हीही मान्यवरांचा सत्कार आयोजित केल्याचे संचालक बागुल यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शैलजा वाघ तर आभार प्रवीण टाके यांनी मानले.