अतिरिक्त आयुक्तांनी घेतला ‘माझी वसुंधरा अभियाना’चा आढावा
नागपूर : महाराष्ट्र शासनाने २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्याबाबत महानगरपालिकांना निर्देशित केले आहे. सदर अभियान नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असून यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीचा मंगळवारी (ता.२२) अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्या कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) डॉ.श्वेता बॅनर्जी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, उपायुक्त अमोल चौरपगार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए.एस.मानकर, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, कार्यकारी अभियंता उज्ज्वल धनविजय, सार्वजनिक आरोग्य अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) संदीप लोखंडे, उपविभागीय अभियंता रूपराव राऊत आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण नियंत्रण, जलसंवर्धन, रेन वाटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता, सांडपाणी, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया, ऊर्जा, पर्यावरण सुधारण व संरक्षणासाठी जनजागृती आदी विषयांचा आढावा घेतला.
नागपूर शहरातील शासकीय इमारती, मेट्रो स्टेशन, उद्याने, शाळांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील अशा सर्व इमारतींची माहिती सादर करणे तसेच मनपाच्या सर्व शाळांमध्ये जलपुनर्भरणाच्या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिले. जलपुनर्भरण अंतर्गत शोष खड्डे तयार करुन त्यात पाणी जिरविण्यात येणार आहे. यासंबंधी शिक्षणाधिका-यांसह सर्व झोनस्तरावर कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.
१ जानेवारी २०२१ला शहरातील नागरिकांना ‘हरित शपथ’ घेण्याकरिता आवाहन
‘माझी वसुंधरा अभियाना’ अंतर्गत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२१ ला मनपातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांसह सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘हरित शपथ’ घेण्यात येणार आहे. यासंबंधी महाराष्ट्र शासनातर्फे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२१ ला मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयामध्ये येतील व सर्व जण एकत्रित ‘हरित शपथ’ घेतील. याशिवाय सर्व झोन कार्यालयामध्ये, मनपाच्या शाळांमध्येही ‘हरित शपथ’ घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिले आहेत.