| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 10th, 2020

  सतरंजीपुरामध्ये २७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

  उपद्रव शोध पथकाची कारवाई : आतापर्यंत शहरातून एक कोटी दंड वसूल

  नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता.९) सतरंजीपूरा झोनमध्ये कारवाई करीत २७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेले सिंगल यूज प्लास्टिक बाळगणा-या दुकानदारावर पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात तसेच उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात झोन पथकाने ही कारवाई केली.

  सतरंजीपूरा झोन अंतर्गत मस्कासाथ येथे मनपा कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक १२ महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी सिंगल यूज प्लास्टिक उपयोगात आणले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने दुकानाची तपासणी केली असता दुकानामध्ये २७० किलो प्लास्टिक आढळले. उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करीत संपूर्ण प्लास्टिक जप्त करण्यात आले व दुकानदार अजय लाल यांचेकडून प्रथम कारवाई अंतर्गत नियमानुसार ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

  आतापर्यंत ३१ टन ९१४ किलो प्लास्टिक जप्त
  मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक निर्मूलनासंदर्भात २३ जून २०१८ पासून संपूर्ण नागपूर शहरामध्ये कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण शहरात २०४८ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३१ टन ९१४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या कारवाईअंतर्गत १ कोटी ६ लक्ष ९५ हजार ३०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रतिबंधित प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत २३ जून २०१८ ते आजपर्यंत मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ४७ हजार ६०७ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे.

  राज्य शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीबाबत मनपातर्फे दहाही झोनस्तरावर कारवाई सुरू आहे. शहरातील नागरिकांनी व दुकानदारांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर बंद करून कारवाई टाळावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145