| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 4th, 2021

  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून ध्येयपूर्ती करा : पोलीस निरीक्षक आशालता खापरे

  सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्वयम् संस्था व माय करिअरतर्फे युवकांना मार्गदर्शन

  नागपूर : शासकीय क्षेत्र हे लोकसेवेचे माध्यम आहे. यामध्ये अधिकारांसह जबाबदा-याही पार पाडाव्या लागतात. लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय विभागांत ठरावीक कालावधीनंतर पदभरती केली जाते. परंतु, निवड होण्यासाठी भरतीप्रक्रियेचे निकष पूर्ण करावे लागतात. म्हणून कोणत्याही पदभरतीत यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध पूर्वतयारी करावी, असा सल्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी युवक-युवतींना दिला. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर क्लबतर्फे रविवारी (ता. ३) आयोजित पोलीस भरती ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी स्वयम् संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.

  आशालता खापरे म्हणाल्या, दहावी-बारावीनंतरच जीवनाचे ध्येय ठरवा. पोलीस सेवेत जायचे असेल तर निवड प्रक्रियेचे स्वरूप समजून घ्या. पूर्ण तयारीनिशी भरतीला सामोरे जा. मैदानी चाचणी अथवा लेखी परीक्षेदरम्यान उमेदवारांकडून चुका होणे हा अपूर्ण तयारीचा परिणाम असतो. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेला समान महत्व द्या. एका निश्चित कालावधीत ध्येय गाठण्याचा संकल्प करा. स्पर्धेला न घाबरता स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून अभ्यासाचे नियोजन करा. शहरी अथवा ग्रामीण पार्श्वभूमीचा करिअरवर कोणताच परिणाम होत नसल्याचे खापरे म्हणाल्या. न्यूनगंड दूर करून आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाचा पाया मजबूत करण्याचा उपदेश त्यांनी युवक-युवतींना दिला.

  प्रास्ताविकातून विशाल मुत्तेमवार यांनी स्वयम् संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी व युवकांना योग्यवेळी अचूक मार्गदर्शन देण्याचा संस्थेचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले. होतकरू, गरजू व प्रतिभावान युवक-युवतींसाठी संस्थेतर्फे सुरू केलेल्या पोलीस भरती ऑनलाईन कोर्सची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. राहुल खळतकर यांनी संचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी जीवन आंबुडारे, किशोर वाघमारे, सिद्धार्थ सोनारे, विजय पायदलवार, मोहन गवळी व पायल भेंडे यांनी सहकार्य केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145