Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 4th, 2021

  शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

  • शिक्षण सभापती, उपसभापती व शिक्षणाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद
  • विद्यार्थ्यांमध्ये उत्साह; सुरक्षेची काळजी घेत चढली शाळेची पायरी

  नागपूर: मिशन बिगीन अगेन अंतर्गत सोमवारी (ता.४) नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा, विद्यालये सुरू झाली. मनपाच्या २९ शाळांमध्ये इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल दहा महिन्यानंतर शाळेची पायरी चढली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. मात्र यासोबतच विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालनही करताना दिसून आले. मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

  विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी त्यांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले. एकमेकांशी हस्तांदोलन टाळणे, पाणी पिण्यासाठी स्वत:च्याच बॉटलचा उपयोग करणे, वर्गात एका टेबलवर एक याप्रमाणेच बसणे आणि महत्वाचे म्हणजे पूर्णवेळ मास्क लावूनच राहणे अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केल्या. शाळा सुरू झाल्याचा आनंद असून नियमांचे पालन करूनच आम्ही शिक्षण घेऊ अशी भावना विद्यार्थ्यांनीही यावेळी व्यक्त केली.

  कोव्हिडच्या प्रकोपामध्ये १० महिन्यांनी मनपाच्या २९ शाळा सुरू होत आहेत. प्रत्येक शाळेमध्ये मनपाने विशेष तयारी केली आहे. प्रत्येक विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग राखून शाळेमध्ये येतो आहे. त्यानंतर त्याची थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणी केली जाते. सॅनिटाईज करून वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. विवेकानंदनगर विद्यालयामध्ये पहिल्याच दिवशी ५०टक्के उपस्थिती आहे. यावरून शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य वाटत असून पालक सुरक्षेची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहेत. विद्यार्थी आनंदी आहेत. आम्हाला शाळेतच शिक्षण द्यावे, अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे गणवेशही लवकरच वितरीत केले जातील. याशिवाय येणा-या काळात लवकरच इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना ‘टॅब’ देण्यात येणार आहेत. पुढे १५ जानेवारीपर्यंत शिक्षणविषयक विविध उपक्रमही मनपाद्वारे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिली.

  शाळेमध्ये कोव्हिड संसर्गापासून बचावासंदर्भात मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. शाळेच्या परिसरात गर्दी होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांना विशिष्ठ अंतर राखून उभे ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची थर्मल स्क्रिनींग करण्यात आली, ऑक्सिमीटरवरून ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली, सॅनिटायजरने निर्जंतुकीकरण केल्यानंतरच वर्गखोलीत प्रवेश देण्यात आला. वर्गखोलीमध्येही सुरक्षेची पुरपूर काळजी घेण्यात येत आहे. वर्गामध्ये एका टेबलवर एक याप्रमाणे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांना मास्क वापरण्यासही सांगण्यात येत आहे. शाळेमध्ये विद्यार्थी येण्यापूर्वी त्यासंबंधी पालकांनी संमतीपत्र देणे मनपाद्वारे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार मनपाच्या २९ शाळांपैकी अनेक शाळांमध्ये संमतीपत्र न दिलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू राहणार आहे, अशी माहिती मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी दिली.

  शहरातील २५ शिक्षक कोव्हिड पॉझिटिव्ह

  शाळा सुरू करताना शिक्षकांनी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य असल्याचे आदेश मनपातर्फे देण्यात आले. त्यानुसार शहरातील खाजगी शाळा व मनपा शाळांच्या शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी केलेली आहे. या चाचणीमध्ये आतापर्यंत मनपाच्या शाळांचे चार शिक्षक व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. तर खाजगी शाळांमधील ६३ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूणच मनपा हद्दीतील ६९ शिक्षक व कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आलेले आहेत.

  दुर्लक्ष करू नका, दिशानिर्देशांचे पालन करा : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.

  शहरामध्ये आज ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून त्याची आधीच पूर्वतयारी झालेली आहे. सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितींना सूचना देण्यात आली व त्याप्रमाणे कामही करून घेण्यात आले आहेत. शाळेतील इयत्ता ९वी ते १२वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांचे आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. निगेटिव्ह रिपोर्ट शिवाय कुणालाही शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही. याव्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी त्यासंबंधी पालकांचे संमतीपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थी घरातून शाळेत व शाळेत घरी पोहोचण्याकरिता आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी ज्या वाहनातून शाळेत येणार आहे, त्याबाबतची पूर्ण खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासोबतच मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, हात धुणे अशा कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष न करता कोव्हिड संदर्भात सर्व दिशानिर्देशांचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145