| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 9th, 2021

  भंडारा दुर्घटना: काय घडले, कसे घडले…?

  महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या सिक न्यू बॉर्न बेबी केअर युनिट या वॉर्डात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून धूर पसरला. वॉर्डात असलेल्या १७ पैकी १० बाळांचा मृत्यू झाला.

  भंडारा: महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या सिक न्यू बॉर्न बेबी केअर युनिट या वॉर्डात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून धूर पसरला. वॉर्डात असलेल्या १७ पैकी १० बाळांचा मृत्यू झाला. बाकीच्या बाळांना वाचवण्यात हॉस्पिटलचे आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले. ही दुर्घटना आज (शनिवार) मध्यरात्री दीड ते दोन दरम्यान घडली. महाराष्ट्र सरकारने घटनेची गंभीर दखल घेतली. सखोल चौकशीचे आदेश दिले. भंडारा दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. (10 children die in fire at bhandara hospital, govt orders inquiry, 5 lakh ex gratia for kin of dead)

  भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. वॉर्डातील तसेच शेजारच्या वॉर्डातील बाळांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम केले. यामुळे ७ बाळांना वाचवणे शक्य झाले. दुर्घटनेत १० बाळांचा मृत्यू झाला. यापैकी ३ बाळांचा आगीत होरपळून तर उर्वरित ७ बाळांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बाळांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  दुर्घटनेत मृत्यू झालेली बालकं एक ते तीन महिने वयोगटातील होती. वजन कमी असणे, प्रकृती नाजूक असणे या कारणामुळे बाळांवर उपचार सुरू होते आणि त्यासाठीच त्यांना सिक न्यू बॉर्न बेबी केअर युनिट येथे ठेवले होते. या वॉर्डमध्ये मध्यरात्री आग कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोषींवर कारवाई होणार आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात मदत कार्य सुरू आहे. रुग्णालयाला आग लागल्यानंतर अनेकांना पर्यायी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत गरोदर तसेच प्रसूती झालेल्या महिला, नवजात अर्भकं आणि रुग्णांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या वैद्यकीय देखरेखीत तसेच उपचारांमध्ये हयगय होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते व महामार्ग निर्मिती आणि बंदर विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145