| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 5th, 2021

  नागपूर महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी

  नागपूर: पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी नागपूरच्या महापौरपदाचाही राजीनामा दिला. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचेच दयाशंकर तिवारी यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केलाय. तिवारी हे नागपूरचे 54वे महापौर ठरले आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या मनोज गावंडे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तिवारी विरुद्ध पुणेकर अशी निवडणूक पाहायला मिळाली. (BJP’s Dayashankar Tiwari wins as Nagpur mayor)

  नागपूरच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज ऑनलाईन पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली. तिवारी यांना 151 पैकी एकूण 107 मतं मिळाली. काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना 27 मतांवर समाधान मानावं लागलं. तर बसपाचे उमेदवार नरेंद्र वालदे यांना 10 मतं मिळाली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत 5 सदस्य अनुपस्थित होते. त्यात तांत्रिक बिघाडामुळे लिंक न मिळाल्याने काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे, गार्गी चोप्रा, बंटी शेळके, शिवसेनेचे किशोर कुमेरिया आणि अपक्ष नगरसेवक आभा देशपांडे हे मतदानापासून वंचित राहिले.

  संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन!

  दयाशंकर तिवारी हे प्रभाग क्रमांक 19चं नेतृत्व करतात. महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित 13 महिन्यांच्या कालावधीसाठी तिवारी यांना महापौरपदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा ऑनलाईन पद्धतीनं ही निवडणूक घेण्यात आली. सर्व सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते.

  निवडणूक प्रक्रिया कशी पार पडली?

  निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी 45 मिनिटे आधी सर्व सदस्यांना लिंक पाठवण्यात आली होती. पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून नगरसेवक निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी 15 मिनिटे आधी सदस्यांना उपस्थिती नोंदवावी लागली.. पीठासीन अधिकाऱ्यांनी सदस्स्यांचे नाव पुकारल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ हात उंचावून मतदान केलं.

  संदीप जोशींचा दारुण पराभव

  55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केलाय.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145