Published On : Thu, Oct 12th, 2017

नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या एकतर्फी विजयामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरुः खा. अशोक चव्हाण

Advertisement
Ashok-Chavan

File Pic

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आता नांदेड- वाघाळा महापालिकेच्या निकालातही काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे स्पष्ट होते असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्वास दर्शविल्याबद्दल नांदेडकर जनतेचे आभार मानून त्यांनी हा विजय नांदेडकर जनतेचा असल्याचे सांगितले. सत्तेच्या आणि पैशांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने नांदेड मध्ये मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न केला. परंतु नांदेडची जनता भाजपाच्या या खोट्या आश्वासनांना, अमिषाला अजिबात भुलली नाही. नांदेडच्या जनतेने विकासाला साथ देत काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केल्याचे खा.अशोक चव्हाण म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, मंत्रीमंडळातील दहा मंत्री, आमदार आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नांदेडमध्ये ठाण मांडून येथील मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, फोडा-फोडीचे राजकारण, खोटा प्रचार आणि वैयक्तीक टीका करुन खालच्या पातळीवरील प्रचार केला. अच्छे दिनाचे आश्वासन देऊन ज्या पध्दतीने भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आहे, गेल्या तीन-साडे तीन वर्षाच्या काळात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त झालेली आहे. नोटबंदी,जीएसटी मुळे व्यापारी मंडळी सोबतच कामगार, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे संपुर्ण राज्य आणि देशभरात भाजपा विरोधात नाराजी आहे. हीच नाराजी ग्रामपंचायत निकाल व त्या पाठोपाठ आता नांदेड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना दिसून आली आहे.

पुढे बोलताना खा.अशोक चव्हाण म्हणाले भाजपची लाट आता ओसरली असून त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. नांदेड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने यावर शिक्कामोर्तब झाला आहे. नांदेडची निवडणुक ही तर सुरुवात आहे, आता त्यापाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन होऊन काँग्रेस पक्ष सत्तेत येईल असा विश्वास यावेळी खा.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेस माजी खा.विलास मुत्तेमवार, आ.नसीम खान, आ. हुस्नबानो खलिफे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे, अतुल लोंढे उपस्थित होते.